भारतासह जगभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपतीबाप्पांचं घरोघरी आणि सार्वजनिक मित्र मंडळांच्या मांडवांत आगमन आज होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशातील भाविक सज्ज झाले आहेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना होईल. या गणपतीबाप्पाची काही रूप तुम्हाला माहिती आहेत का, नसतील तर आज आम्ही त्याबाबत सांगणार आहोत. इंडिया डॉट कॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हिंदू पुरणांनुसार गणपतीबाप्पांना बुद्धी, कला, विद्येची देवता मानलं जातं. कोणतंही कार्य सुरळीत पार पडावं म्हणून प्रथम गणेशाचं पूजन करण्याची परंपरा हिंदूंमध्ये आहे. गणपतीबाप्पांना भक्तांची विघ्न हरणारा म्हणून विघ्नहर्ताही म्हटलं जातं. अशी या बाप्पाची आणखी काही रूपं आपण जाणून घेऊ या.
एकदंत – एकदंत म्हणजे एक दात असलेला. हिंदू पुराणांनुसार शंभू महादेवांच्या भेटीला आलेल्या परशुरामांना रोखून धरल्यामुळे गणपतीचा एक दात त्यांना कापून टाकला त्यामुळे गणपतीला एकदंत म्हणून ओळखलं जातं.
वक्रतुंड – मत्सर नावाच्या दैत्याचा सर्वनाश करून तिन्ही लोकांना पुन्हा प्रस्थापित करून त्यांना वैभव मिळवून देणारा गणपती म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलं जातं.
गजानन – गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. त्यामुळे हत्तीचं तोंड असलेला तो गजानन असं नाव गणपतीला पडलं. लोभीपणाचं हरण करण्याचं काम गजानन करतो.
लंबोदर – लंब म्हणजे मोठं किंवा लांब आणि उदर म्हणजे पोट त्यामुळे गणपतीबाप्पाला लंबोदर म्हटलं जातं. राग, संतापाची प्रत्यक्षमूर्ती असलेल्या क्रोधासूराचा वध गणपतीबाप्पाने केला. लंबोदर क्रोधाचा नाश करतो.
विघ्नराज – देवांवर आणि माणसांवर येणारी विघ्न हरण म्हणजे नाहीशी करणारा तो विघ्नहर. सोप्या शब्दांत सांगायचं तर संकटांचं निवारण करणारा विघ्नहर किंवा विघ्नराज.
कृष्णपिंगाक्ष – कृष्ण म्हणजे काळा रंग आणि पिंगाक्ष म्हणजे पिंगट रंगाचे डोळे असणारा म्हणून गणपतीला कृष्णपिंगाक्षही म्हणतात हे त्याचं एक रूप आहे.
महोदरा – महोदरा म्हणजे मोठं पोट असलेला देव म्हणजेच गणपती. हिंदू पुराणांत सांगितल्याप्रमाणे गणपतीबाप्पाने मोहासुराची याच्याशी युद्ध करून नंतर त्याची पापं माफ करून त्याला पाताळलोकी पाठवलं होतं.
अशा या गणपतीबाप्पांची सेवा करण्यासाठी सगळेच आता सज्ज झाले आहेत आणि त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणपती बाप्पा मोरया.