साताऱ्यात बैलाला अमानुष पद्धतीने मारल्याची घटना समोर आली आहे. जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात बैलाचा पाय तोडून, शेपटूही तोडून गळ्याला फास दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शर्यतीतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र ठोस माहिती आणखी पुढे येऊ शकलेली नाहीय.
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, बैलाचा पाय तोडण्यात आलाय. शेपटीही कापण्यात आलीय आणि निर्दयीपणाचं आणखी एक पाऊल पुढे टाकून बैलाला फाशी देण्यात आलीय. क्रुरतेच्या सगळ्या परिसीमा संबंधित आरोपीने पार केल्या आहेत. सरताळे परिसरातली अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे.
अतिशय निर्दयी घटनेची कुडाळ पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. बैलाच्या अंगावर गुलाल टाकून त्याला निर्दयीपणे फास लावून क्रूरतेने हत्या करणारा अज्ञात नेमका कोण याचा तपास पोलीस करत आहेत. तर या सर्व प्रकाराने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या बैलांच्या शर्यतीवर बंदी आहे. तरी देखील साताऱ्यात अश्या छुप्या पद्धतीने बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जात आहे. मृत बैलाच्या अंगावर गुलाल असल्याने शर्यतीत बैलाने समाधानकारक कामगिरी केली नसल्याचा राग धरुन अज्ञाताने असं कृत्य केल्याचा लोकांना संशय आहे. खिलार जातीचा हा बैल आहे.
(बातमीत वापरलेले छायाचित्र प्रातिनिधिक)