स्विगी बॉयच्या मदतीमुळे निवृत्त कर्नलचा जीव वाचला

मुंबईकरांचं स्पिरीट आणि मुंबईकरांची दर्यादिली सिद्ध करणारी एक जबरदस्त घटना समोर आली आहे. स्विगी बॉयच्या मदतीमुळे एका निवृत्त कर्नलचा जीव थोडक्यात बचावला आहे. खुद्द स्विगीनंच याबाबत इन्स्टाग्रावरुन पोस्ट करत माहिती दिली आहे. अस्वस्थ वाटू लागलं म्हणून निवृत्त कर्नलच्या मुलानं त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कार काढली. कारमधून जात असताना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये ते अडकले! आता रुग्णालय कसं गाठायचं, असा प्रश्न कर्नल आणि त्यांच्या मुलापुढे उभा राहिला होता. पण अखेर देवासारखा एक माणूस दुचाकीवरुन आला आणि याच माणसामुळे निवृत्त कर्नलचे प्राण थोडक्याच वाचले!

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असं या घटनेतून बचावल्यानंतर निवृत्त कर्नल यांना वाटलं असणार, हे नक्की! पण जीव वाचण्याआधी कर्नल यांच्यासोबत जे घडलं ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. प्रचंड ट्रॅफिकमध्ये निवृत्त कर्नल अडकले. मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. जीव वर-खाली होत होता. अस्वस्थपणानं नकोसं केलं होतं. निवृत्त कर्नल मोहन मलिक यांचा काहीच सुचेनासं झालं होतं. आपल्या वडिलांना आता रुग्णालयात कसं पोहोचवायचं, असा प्रश्न निवृत्त कर्नल यांच्या मुलाला ट्रॅफिक पाहून पडला होता.

अशावेळी अखेर कर्नल मलिक यांचं मुलगा एखादी दुचाकी थांबवून आपल्याला मदत करेल, या भावनेनं खाली उतरला. बाईकला थांबवण्याचा प्रयत्न मलिक यांचा मुलगा करत होता. पण कुणीच थांबायला तयार होईना!

अशातच स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयनं हा सगळा प्रकार पाहिला. आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून तो निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव वाचवण्यासाठी आत्मीयतेनं धावला. या स्विगी बॉयचं नाव आहे मृणाल किरदत. मृणाल हा स्विगीसाठी काम करत असून तो सांताक्रूझला राहतो. निवृत्त कर्नल मलिक यांची तब्बेत बिघडत चालली असल्याचं पाहून मृणालने त्यांना आपल्या बाईकवर बसवलं आणि थेट लिलावती रुग्णालयात नेलं. ट्रॅफिकमधून कशीबशी वाट काढत, हॉर्न वाजवत तर कधी मोठ्यानं ओरडून लोकांना बाजूला करत मृणालनं वायूवेगानं निवृत्त कर्नल मलिक यांना रुग्णालयात पोहोचवलं. तिथे डॉक्टरांना सांगून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिलं. मृणालच्या या कामगिरीमुळेच निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव थोडक्यात बचावलाय.

काही दिवस रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेतल्यानंतर आता निवृत्त कर्नल मलिक हे ठणठणीत बरे झाले असून त्यांनी या स्विगी बॉयचे मनापासून आभार मानले आहेत. स्विगी बॉय मृणाल आज नसता, तर मी माझ्या कुटुंबासोबत नसतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. मृणाल माझ्यासाठी तारणहार आहे, असं म्हणत त्यांनी मृणालचे आभार मानलेत.

स्विगीनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही संपूर्ण घटना शेअर करुन असून आता सोशल मीडियात स्विगी डिलिव्हरी बॉय असलेल्या मृणालचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. त्यांनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका निवृत्त कर्नलचे प्राण वाचले आहेत. इतकंच काय तर माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचीही प्रचिती या घटनेतून समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.