यजमान कतारला शुक्रवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अ-गटातील या सामन्यात आफ्रिकन चषक विजेत्या सेनेगलने कतारचा ३-१ असा पराभव केला. कतारला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गोलखाते उघडण्यात यश आल्याचाच दिलासा मिळाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या दृष्टिने प्रयत्न केले. कमालीच्या वेगाने चाली रचून एकमेकांच्या बचाव फळीवर दडपण आणण्याचे त्यांचे तंत्र होते. या नादात अनेकदा खेळाडूंकडून चुका झाल्याचे पाहायला मिळाले.
पूर्वार्धात ४१व्या मिनिटाला सेनेगलने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. बचाव फळीकडून झालेली चूक कतारला चांगलीच महागात पडली. चेंडूला पास देताना बचाव फळीचा अंदाज चुकला आणि याचा फायदा उठवत बुलाये डियाने सेनेगलचे खाते उघडले. त्यापूर्वी डियाला कतारच्या अफिफला धोकादायक पद्धतीने अडवण्याच्या नादात पिवळे कार्ड मिळाले होते.
सेनेगलकडे मध्यंतराला १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच फमारा डिएधिओयूने जबरदस्त हेडर मारून गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. उत्तरार्धात बदली खेळाडूंचा बोलबाला राहिला. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मोहम्मद मुन्तारीने (७८व्या मिनिटाला) कतारसाठी विश्वचषक स्पर्धातील पहिला गोल केला. मात्र, त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले. ८४व्या मिनिटाला सेनेगलचा बदली खेळाडू बाम्बा डिएंगने सॅब्ली-एन्डीआयेची चाल सार्थकी लावताना सेनेगलचा तिसरा गोल केला.