मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे आमदार आज गुवाहाटीला जाणार
राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. अशात आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व्खाली गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत.
मुंबई विमानतळावरून सकाळी साडेनऊ वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे 178 सदस्य गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने उड्डाण करणार आहेत. गुवाहाटी विमानतळावर दुपारी 12 वाजता आगमन झाल्यावर पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार सत्तांतर नाट्यावेळी प्रसिद्ध झालेल्या रेडिसन ब्लू हॅाटेलवर मुक्काम करणार आहेत.
आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सहकारी आमदार आणि खासदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या सोबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट नियोजित करण्यात आली असल्याची माहीती समोर येत आहे. जून महिन्यात म्हणजेच जवळपास पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. यावेळी आसाममधील गुवाहाटी सतत बातम्यांमध्ये झळकत होतं. कारण याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार थांबले होते.
गुलाबराव पाटील असणार गैरहजर –
एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार आज गुवाहाटीला दर्शनासाठी जाणार असले तरी गुलाबराव पाटील मात्र यावेळी अनुपस्थित असणार आहेत. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. ‘जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत’, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.