मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ चॅनेलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विविध विषयांवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या चॅनेलवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळा पाहायला मिळणार आहे. हा सोहळा 3 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी चॅनेलवरच्या प्रत्येक सीरियलमधल्या कलाकारांनी जोरदार तयारी केली आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधल्या या कलाकारांना वर्षभर आपण त्यांच्या भूमिकेत पाहत असतो. परंतु पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व कलाकारांना त्यांच्या ओरिजनल रुपात पाहायला मिळतं.
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या सोहळ्यामध्ये अनेक जण डान्स करणार आहेत. त्यामुळे या कलाकारांची डान्स प्रॅक्टिस ही विशेष झाली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकारांनी देखील या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी ही खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर हिने देखील या कार्यक्रमात डान्स केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून माधवी निमकरच्या डान्स प्रॅक्टिसचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती ‘440 करंट माझा…’ या गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. या सोहळ्यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचं तिनं म्हटलं आहे. तसंच या सोहळ्याच्या निमित्ताने दुसऱ्या मालिकेतल्या कलाकारांना, चाहत्यांना भेटता येतं, अनेकांशी मैत्री होते, त्यामुळे या सोहळ्याची वाट बघतोय, असं ‘शालिनी’ने सांगितलं.
माधवी निमकरव्यतिरिक्त इतर मालिकांचे कलाकारदेखील सोहळ्यातल्या परफॉर्मन्ससाठी मेहनत करताना दिसून येत आहेत. ‘तयारी सुरु झालेय मंडळी..!! आपल्या घरचा सोहळा आहे, नक्की यायचं..!’ अशा कॅप्शनसह स्टार प्रवाहच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम चॅनेलवरून त्याचे व्हिडीओज शेअर करण्यात आले आहेत. ‘सोहळा महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात कीर्ती, दीपा, साजिरी आणि पिंकी देवीचा गोंधळ सादर करणार आहेत. या सर्वांच्या डान्सची झलक दाखवणारा एक व्हिडीओ इन्स्टाला शेअर करण्यात आलाय. त्यामध्ये हिरव्या नऊवारीत या सर्व जणी गोंधळ सादर करताना दिसत आहेत.
या कार्यक्रमात अप्पू आणि शशांकचा होळी विशेष परफॉर्मन्सदेखील पाहायला मिळणार आहे. होळी जरी झाली असली तरी अप्पू आणि शशांकच्या डान्सची धुळवड प्रेक्षकांना 3 एप्रिल रोजी पाहता येणार आहे. अनिरुद्ध, कुक्की, सिद्धार्थ आणि वैभव यांचेही परफॉर्मन्स होणार आहेत. स्टार प्रवाह चॅनेलवरच्या मालिकांचे फॅन्स असणाऱ्यांना या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस डान्स पाहायला मिळणार आहेत हे नक्की.