आज दि.२६ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
यांची खुर्ची जाण्याची शक्यता

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ५० मंत्री अविश्वास प्रस्तावापूर्वी बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला यामुळे मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या सरकारमधील 25 फेडरल, 19 सहाय्यक आणि 4 राज्यमंत्री बेपत्ता आहेत. संकटाच्या काळात इम्रान खान यांचे मंत्री मैदानातून पळून गेले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

अजित पवार यांनी एसटी
कर्मचाऱ्यांना दिला अल्टिमेटम

एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्टिमेटम दिला आहे. 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, ही शेवटची संधी असून, गैरहजर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून पगार वेळेत दिला जाईल असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं आहे.

डायबिटीस, कॅन्सर, हायबीपीची
औषधं महागणार

महागाईचा भडका अजूनही कायम आहे. आता जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक फटका बसणार आहे. जीवनावश्यक 800 औषधांच्या किंमती वाढणार आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला होणार आहे.
डायबिटीस, कॅन्सर, हायबीपीची औषधं महागणार आहेत. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून औषधांचे दर वाढवण्यात येणार आहेत. आता औषधंही महागणा आहेत.

भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी
उत्तर द्यायला पाहिजे : फडणवीस

विधानसभेत आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलीच पाहिजेत, असं यावेळी फडणवीस म्हणाले. “आम्ही इतकी भ्रष्टाचाराची प्रकरणं पुराव्यानिशी मांडली. मुंबई महानगर पालिकेत कोविडच्या काळात कशी लूट झाली, याची उदाहरणं दिली. त्याची कुठलीच उत्तरं सत्ताधाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी भावनिक भाषण केलं. ही त्यांची जबाबदारी आहे की या भ्रष्टाचाराचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

पुतिन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर रशियन
संरक्षण मंत्र्यास हृदयविकाराचा झटका

युक्रेनचे मंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी रशियन संरक्षण मंत्री सेर्गेई शोईगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केलाय. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि शोईगु यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात आलाय. पुतिन आणि शोईगु यांच्यामध्ये युक्रेनमधील विशेष लष्करी मोहीम अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप झाले. पुतिन यांनी या अपयशासाठी शोईगु यांना जबाबदार ठरवलं. याचाच धसका घेतल्याने शोईगु यांना झटका आल्याचं अँटोन यांचं म्हणणं आहे.

शववाहिनी न मिळाल्याने चिमुकलीचा मृतदेह
बापाने नेला दहा किलोमीटर खांद्यावर

माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं, अशा घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. छत्तीसगडमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून त्यासंदर्भात थेट छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्या ७ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन एका बापानं आपल्या घरापर्यंत १० किलोमीटरची पायपीट केल्याचा प्रकार आता समोर आला असून त्यावरून सरकारी यंत्रणांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे

मंत्र्यांना अडचणीत बायको नाहीतर
मेव्हणा अडचणीत आणतो : गडकरी

माझा अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत बायको नाहीतर मेव्हणा अडचणीत आणतो. नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले म्हणजे खाजगी सचिव. मी माझ्या मेव्हण्याला तुझे काम असेल तरच माझ्याकडे ये असे सांगितले. लोकांचे काम घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही. तू या भानगडीत पडायचे नाही,” असे नितीन गडकरी म्हणाले.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या
विरोधात पोलिसात तक्रार

द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भोपाळी लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भोपाळी शब्दाचा अर्थ होमोसेक्शुल असं त्यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईतील एक पत्रकार रोहित पांडे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे मुळचे भोपाळचे राहणारे आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत विवेक अग्निहोत्री यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांना
दिली पोलिसांनी नोटीस

किरीट सोमय्या यांना आज पोलिसांनी नोटीस दिली त्यात असे म्हटले आहे की, कोणत्याही खाजगी जागेमध्ये अनधिकृत प्रवेश करु नये. आपणाकडून आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनादरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडून दखलपात्र/अदखलपत्र स्वरुपाचे कोणतेही गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

‘पठाण को कैसे रोकोगे..!’ 8 पॅक Abs मध्ये शाहरुखचा जलवा; थक्क करणारा फिटनेस

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज अशी आयपीएलच्या या सीझनची पहिली मॅच होणार आहे. त्यापूर्वी KKR चा मालक शाहरुख खानचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. कारणंही तसंच आहे. शाहरुखने 8-पॅक अ‍ॅब्स फ्लाँट करणारा फोटो पोस्ट केला आहे. 56 वर्षीय या अभिनेत्याने शर्टलेस लुक शेअर केला आहे. हा फोटो त्याचा आगामी सिनेमा ‘पठाण’ मधील असावा अंदाज आहे. अभिनेता सध्या स्पेनमध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणसह पठाणचे शूटिंग करत आहे.

मार्च एन्डला विदर्भात सूर्य ओकणार आग; हवामान खात्याने केलं अलर्ट

आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. त्यामुळे संभाव्य ‘असनी’ चक्रीवादळाचा धोका देखील शमला आहे. पण सध्या बंगालच्या उपसागरात नैऋत्य वारे सक्रिय झाले आहेत. येत्या चोवीस तासात हे वारे ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये जाऊन धडकणार आहेत. त्यामुळे पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून हवामान खात्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याच्या कारला भीषण अपघात; दोघे जागीच ठार, 3 गंभीर

अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याच्या कारला समोरून येणाऱ्या वेगवान पिकअपने जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत कार चालकासह एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा देखील समावेश आहे. संबंधित सर्वांना सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे.

एअर अॕम्बुलंन्स च्या नावावर लाखोंची लूट; अखेर दिल्लीतील बंटी-बबलीचं बिंग फुटलं

दिल्ली पोलिसांनी एअर रुग्णवाहिकेच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव नवदीप सिंह आहे. पोलिसांकडून या आरोपीची प्रेयसी प्रभदीप कौर हिचा शोध सुरू आहे. तीदेखील प्रियकरासोबत एकत्र येऊन फसवणूक करीत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून 15 ते 20 लोकांनी एअर रुग्णवाहिकेच्या नावावर 25 ते 30 लाख रुपयांचा फ्रॉड केला आहे. आरोपी नवदीपला शाहदरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.