असह्य उकाड्यानंतर पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पावसाचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे; पण पावसाळ्यात आरोग्याला जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषत: पावसाळ्यात त्वचेचे विकार होण्याचं प्रमाण जास्त असतं. छोटे उपाय करून आपण त्यावर मात करू शकतो. ‘जनसत्ता’ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पावसाळ्यात वातावरणात बदल झाल्यानं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं त्वचा तेलकट बनते. यामुळे त्वचेचे विकार होण्याचा धोका बळावतो. शिवाय पावसाळ्यात साथीचे आजार व बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यताही असते. त्यामुळे या काळात त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. अगदी साधे उपाय करून आपण या हंगामात समस्यांवर मात करू शकतो. दिल्लीतले फेशियल अॅस्थेटिक्स डॉ. देबजानी चक्रवर्ती यांनी याबद्दल ‘इंडियन एक्सप्रेस’ला माहिती दिली.
शरीर स्वच्छ ठेवून इन्फेक्शनपासून राहा दूर
पावसाळ्यात इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या दिवसांमध्ये त्वचा अधिक तेलकट होते व त्वचेमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता निर्माण होऊन पुरळ, मुरमं, खाज सुटणं आदी समस्यांचा सामना करावा लागतो. घाम आल्याने डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. या इन्फेक्शनपासून सुटका हवी असल्यास शरीर नेहमी स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ न देणं गरजेचं असतं. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. त्वचा कदापि कोरडी पडू देऊ नये. दररोज मॉश्चरायझरचा वापर करणं आवश्यक आहे.
चेहरा, पाय, कपाळ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाम येत असल्यास हा हायपरहायड्रॉसिसचा प्रकार असतो. घामामुळे शरीरातून दुर्गंध येतो व इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. या समस्येपासून वाचण्यासाठी शरीराची दररोज स्वच्छता ठेवणं आवश्यक असतं. रोज स्वच्छ पाण्याने स्नान करून सुती टॉवेलने शरीर साफ करावं. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने घामावर नियंत्रण मिळवण्यासाठी बोटॉक्स इंजेक्शन घेणं गरजेचं आहे.
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने तिथल्या नागरिकांना पावसाळ्यात त्वचेच्या अॅलर्जीचा त्रास होत असतो. बऱ्याचदा पूर्ण शरीरावरच्या त्वचेला अॕलर्जी येते. अनेकांना हात-पाय व कमरेच्या वरच्या भागात ही अॅलर्जी येते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शक्यतो प्रदूषण असलेल्या जागी जाऊ नये. कामावरून आल्यानंतर स्नान करणंही गरजेचं आहे. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादं अँटी-बॅक्टेरिअल क्रीम शरीरावर लावावं.