गोंदिया जिल्हात नागझिरा, नवेगाव व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसीने येतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळं पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. मात्र, आज काही पर्यटक जंगल सफारी करीत होते. अचानक T.30 या वाघाचे दर्शन झाले. याचा मग पर्यटकांनी व्हिडीओ काढला. सोशल मीडियात तो व्हिडीओ पसरला. पर्यटकांमध्ये उत्साह संचारला. नागझिरा-नवेगाव या भागातही वाघोबा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते दिसतात, याची खात्री पर्यटकांना झाली. त्यामुळं या भागातील पर्यटनाचा आता चांगले दिवस येतील, असं म्हणायला हरकत नाही.
वाघ बघायचा आहे, तर ताडोबा हे समीकरण झालंय. ताडोबातील वाघांनी उच्छाद मांडला. वन्यप्राणी-वाघ असा संघर्ष सुरू झाला. पण, त्या मानानं नागझिरा तसा शांत. वाघ आहेत. मात्र, ते मोजकेच असल्यानं कधी दिसतात, तर कधी दिसत नाही. त्यामुळं वाघ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक नाराज होतात. आता या व्हिडीओने थोडासा उत्साह संचारला आहे.
वाघोबा आपला ऐटीत चालत आहे. त्याचं चालणं पाहून जंगल सफारी मंगल झाल्याची अनुभूती पर्यटकांना नक्कीच आली असणार. त्यामुळं व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाला जाणारे आता नागझिऱ्याकडे नक्कीच वळतील. नागझिऱ्यात इतर वन्यप्राणीही आहेत. शिवाय जंगल सफारीसाठी अनुकूल वातावरण आहे.