आज दि.२६ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अनेक एसटी कर्मचारी संपावर
ठाम, 24 आगारातील सेवा सुरू

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला घाबरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, पगारवाढीनंतर 10 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्यातील 24 आगारांमधील एसटी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारकडून सर्व
राज्यांमध्ये अलर्ट जारी

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकादा वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ‘B.1.1529’ सापडला आहे. नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही सर्व राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या संसर्गाने अनेक देशांची अर्थव्यवस्था घसरली आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या
निवासस्थानी ईडीचा छापा

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर २०२१ रोजी) सकाळी छापा टाकला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आलीय. जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत.

विधानपरिषद निवडणूक कोल्हापूर,
धुळे-नंदुरबार, मुंबईत बिनविरोध

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातल्या एकूण ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. आज दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे. यामध्ये कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. पण नागपूरमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी दिली गेल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप
सरकार येणार : नारायण राणे

पुन्हा एकदा भाजपने महाराष्ट्रात आपले सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. आतापर्यंत भाजपकडून तीनवेळा हा दावा करण्यात आला होता. मात्र, तसे काही घडलेले नाही. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केले आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान केले आहे.

बूस्टर डोस देण्याचे नियोजन
स्पष्ट करा : उच्च न्यायालय

अमेरिका आणि इतर काही पाश्चात्य देशांमध्ये सध्या बूस्टर डोस दिले जात आहेत. मात्र, अद्याप भारतात बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. “अद्याप भारतात बूस्टर डोस उपलब्ध का करून देण्यात आलेला नाही? केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी. जर असे बूस्टर डोस आपल्याकडे आवश्यक असतील, तर ते कधीपर्यंत दिले जाऊ शकतात, याचं नियोजन देखील सादर करावं”, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख
शरद पवार दिल्लीत दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला गेल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

परमबीर सिंह यांच्यावर योग्य ती
कारवाई केली जाईल : दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांना माध्यम प्रतिनिधींनी परमबीर सिंह यांनी केलेल्या गैरव्यवहारांसाठी त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल? अशी विचारणा केली असता दिलीप वळसे पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली. “पोलीस सेवा नियमावलीनुसार परमबीर सिंह यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाईल”, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मेडिकल कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये
१८२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

कर्नाटकमधील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये करोना संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. येथील १८२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी हा आकडा केवळ ६६ इतका होता. करोनाबाधितांची संख्या आणखीन वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय. धक्कादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी करोना लसींची दोन्ही डोस घेतले होते. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फेशर्स पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं. या पार्टीनंतरच करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.