प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2020मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. कोरोनाच्या काळात त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींना मदत केली होती. मात्र 2 वर्षातच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही.
प्रिया बेर्डे यांनी 7 जुलै 2020 साली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांच्याबरोबर 2020मध्ये अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे, अभिनेता विनोद खेडेकर, निर्माता संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक सुधीर निकम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
सिनेसृष्टीत काम करत असताना अनेक संकटांचा समाना करावा लागला आहे. त्यातून मार्ग काढत इथवर येऊन पोहोचलो आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सिनेसृष्टीतील कलाकारांकडे काम नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. राजकारणात जाऊन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं प्रिया बेर्डे यांनी 2020मध्ये म्हटलं होतं.
प्रिया बेर्डे या प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना अभिनय आणि स्वानंदी बेर्डे ही दोन मुलं आहे. दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. दोघांनी आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवतं सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. पण अभिनय आणि स्वानंदी या दोघांनाही त्यांचं अभिनयातील करिअर करायचं असून राजकारणात येण्याची त्यांनी इच्छा नाही.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरी अभिनय क्षेत्रातही त्या सक्रीय आहेत. अनेक हिंदी तसेच मराठी मालिका आणि सिनेमात त्या काम करत आहेत. धनंजय माने इथंच राहतात का या धमाल विनोदी नाटकात सध्या त्या काम करत आहेत. तसंत त्या सोशल मीडियावरही सक्रीय असून मुलांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.