ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचा गेल्या वर्षी हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. तो जगातील दिग्गज लेगस्पिनर्सपैकी एक होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम क्रिकेटरपैकी एक असलेला शेन वॉर्न हा अनेक वर्षं देशासाठी खेळला आणि त्याने अनेक विक्रमही नावावर केले होते. रिटायरमेंटनंतर तो अनेक फ्रँचायझींमध्ये सामील झाला आणि कॉमेंट्रीही केली होती. शेन वॉर्नने खूप काम केलं होतं, त्यामुळे त्याने बरीच संपत्ती गोळा केली होती. वॉर्नच्या मृत्यूच्या एका वर्षांनी आता त्याच्या संपत्तीची वाटणी झाली आहे.
वॉर्नने 171 कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली आहे. ही संपत्ती कोणाला मिळणार, याचा निर्णय झाला आहे. ही मालमत्ता त्याची आधीची पत्नी सिमोन आणि गर्लफ्रेंड लिसा हार्ले या दोघींनाही मिळणार नाही, तर ती त्याच्या मुलांना वाटली जाणार आहे. जॅक्सन, ब्रुक आणि समर या तीन मुलांमध्ये वॉर्नची मालमत्ता वाटली जाईल. व्हिक्टोरियाच्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्याचं गुरुवारी ऑस्ट्रेलियन मीडियाने वृत्त दिलं. 31-31 टक्के या तिघांमध्ये विभागले जातील, या शिवाय वॉर्नच्या संपत्तीतील दोन टक्के रक्कम त्याच्या भावाच्या कुटुंबाकडे जाईल.
वॉर्नची यामाहा बाइक, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज जॅक्सनला देण्यात येणार आहेत. त्याच्या एकूण संपत्तीपैकी 39 कोटींची रिअल इस्टेट आहे. त्याच्याकडे व्हिक्टोरियामध्ये एक घर होतं, ज्याची किंमत 39 कोटी रुपये आहे, तर त्याच्या ऑस्ट्रेलियन बँक खात्यात 5 मिलियन डॉलर्स आहेत. वॉर्नच्या एचएसबीसीच्या अकाउंटमध्ये 500,000 डॉलर्स आहेत, तर 24 कोटीपेक्षा जास्तचे शेअर्स आहेत. वॉर्नची 295,000 लायबिलिटिसी देखील आहे.
शेन वॉर्नचं गेल्या वर्षी 4 मार्च 2022 रोजी निधन झालं होतं. थायलंडमधील समुई येथील एका रिसॉर्टमध्ये त्याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 52 वर्षीय वॉर्नचं निधन हार्ट अॅटॅकने झाल्याची पुष्टी करण्यात आली होती. वॉर्न त्याच्यामागे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून गेला होता. त्याच्या संपत्तीत कुणाला वाटा मिळणार हे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याच्या सर्व संपत्तीवर त्याची तीन मुलं आणि त्याच्या भावाच्या कुटुंबाचा हक्क असेल. वॉर्नच्या संपत्तीतून त्याची पत्नी व गर्लफ्रेंड यांना एक रुपयाही मिळणार नाही. व्हिक्टोरिया कोर्टाने याबद्दल निर्णय दिला आहे.