केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने येत्या 14 फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. 14 फेब्रुवारीला गायींना अलिंगन द्या, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं होतं. मात्र, यानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. विरोधी पक्षानेही या निर्णयावर जोरदार टीका केली होती. यानंतर केंद्र सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे.
पशु कल्याण मंडळानं काल नवीन पत्रक जारी करत काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहनपत्र मागं घेत असल्याचं जाहीर केलं आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाच्या सूचनेनंतर पशु कल्याण मंडळाकडून 14 फेब्रुवारीसंदर्भात जारी करण्यात आलेलं पत्रक मागं घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय होता केंद्र सरकारचा निर्णय?
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने या निर्णयाबाबत एक पत्र जारी केले होते. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी एक पत्र काढून 14 फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ असे या पत्रात म्हणण्यात आले होते.
राष्ट्रवादीकडून टीकेची झोड
पशु कल्याण मंडळानं जारी केलेल्या पत्रकावर देशभरातून टीका करण्यात आली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रश्न विचारले होते. अनेकांनी भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या दरम्यान गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसू बारस हा सण असताना काऊ हग डेची संकल्पना का काढली असा सवाल करण्यात आला होता. आता काऊ हग डे मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पशू कल्याण बोर्डाचं डोकं ठिकाणावर आहे का? असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आपण गाईला गोंजारतो, चारा टाकतो पण हे बोर्ड गाईला मिठी मारायला लावत आहे. गाईला मिठी मारताना गाईने शिंगाने फेकून दिलं किंवा लाथ मारली तर मग कसं करायचं असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.