सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले आहे. भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणुकीसाठी एकूण 15 जागा असून एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तर उर्वरीत 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी युती असून एकास एक लढत होत आहे.
महाविकास आघाडीला खाली खेचण्यासाठी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले असून या दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिंदे गटाचे अशोक दळवी, विद्यापन जिल्हा बँक संचालक विद्या बांदेकर हे मैदानात उतरले आहेत. तर या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा खरेदी विक्री संघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे विकास सावंत हे मैदानात उतरले आहेत.
सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार असून चार नंतर काही काळ विश्रांतीनंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. जर 14 जागांचे निकाल रात्री उशिरापर्यंत येणार असून 944 सभासद सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे भवितव्य ठरवणार आहेत. शिंदे सरकार आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारातील पहिलीच निवडणूक दीपक केसरकर यांच्यासाठी ही महत्त्वाची प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे.