पाऊस कोसळू लागला, की पश्चिम घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागतात. या दरडींमुळे अनेकदा रस्ते बंद पडतात. मदत पोहोचून हा मार्ग मोकळा होईपर्यंत दळणवळण ठप्प होते. साताऱ्याजवळील प्रसिद्ध वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता नुकताच असाच दरड कोसळून पूर्णपणे बंद झाला होता. शासकीय मदत पोहोचण्यास विलंब होत असल्याने या भागातील ग्रामस्थांचे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत होते. अशा वेळी या भागातील दोन आजोबा पुढे सरसावले आणि त्यांनी हातात कुदळ आणि फावडे घेत भर पावसात ही दरड मोकळी केली आणि हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. या दोन आजोबांच्या या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रकांत मोरे (वय ६५) आणि बळीराम सपकाळ (वय ५५) या दोन ज्येष्ठ नागरिकांची ही यशोगाथा आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी अशीच दरड कोसळली होती. यामुळे भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळली असल्याने या रस्त्यावरून ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होतं. ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन या गावातील चंद्रकांत मोरे आणि बळीराम सपकाळ पुढे सरसावले. या दोन ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली. या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जातं आहे. या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.