आज दि.२७ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

३५ राज्यांमधील १७४ जिल्ह्यात
डेल्टा व्हेरिएंट आढळला

महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा धोकादायक डे व्हेरिएंटचे ५० टक्के रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने राज्य सरकारनेही कडक नियम लागू केले आहेत. देशातील ३५ राज्यांमधील १७४ जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. तर नुकत्याच सापडलेल्या डेल्टा प्लस म्युटेशनचे आतापर्यंत १२ राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत.

भारतात सिक्वेन्सिंगबाबत उदासीनता,
त्यामुळे गंभीर व्हेरिएंटचा फैलाव

कोरोना विषाणूमध्ये पुन्हा पुन्हा म्युटेशन होत असल्याने गंभीर व्हेरिएंट फैलावत आहे. म्युटेशनची ओळख पटविण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगची गरज आहे. परंतु भारतात सिक्वेन्सिंग करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. जगभरातील देशांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत तेथील जिनोम सिक्वेन्सिंगचे प्रमाण चांगले आहे. भारतात आतापर्यंत ४५ हजार नमुन्यांची सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. तज्ज्ञांकडून भारतात जिनोम सिक्वेन्सिंग वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान १३५ कोटी
डोसची व्यवस्था केली जाणार

कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका ओळखून १२ ते १८ वर्षांच्या मुलांचे क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शनिवारी (२६ जून) सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत १८ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांना (९३-९४ कोटी) कोविड लस देण्यासाठी १८६ ते १८८ कोटी डोसची गरज आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान जवळपास १३५ कोटी डोसची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करताना दिली आहे.

जॉन्सनच्या लसीचा
एकच डोस पुरेसा

देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून अनेक राज्यात या मोहीमेला आता वेग आला आहे. १८ ते ४४ आणि ४५ ते ६० तसेच त्यापुढील वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना ही लस देण्यात येत आहे. साधारणता कोशील्ड किंवा कोवॅक्सिन या लसीचे प्रत्येकी दोन डोस केंद्र सरकारमार्फत मोफत देण्यात येत असून रशियातून आलेली स्पुटनिक लस देखील खासगी रुग्णालयांत उपलब्ध झाली आहे. पुढील महिन्यात जॉन्सनची लस देखील भारतात उपलब्ध होणार असल्याने लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार आहे. विशेष म्हणजे या लसीचा एकच डोस घ्यावा लागणार आहे.

कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना धोका
घ्यावा लागेल दरवर्षी बूस्टर डोस

कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असून त्याकरिता उपाययोजना म्हणून त्यांनी दरवर्षी लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अंदाज वर्तविला आहे की कोविड १९ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना ( वृद्ध व्यक्ती) सर्वाधिक धोका असतो आणि त्यातील वेगवेगळ्या प्रकारांपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी लसचा बूस्टर डोस घ्यावा लागतो.

महागाई भत्ता जुलै 2021 पासून,
सदर निवेदन चुकीचे

कर्मचाऱ्यांना डीए देण्याचा आणि जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता लागू करण्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदेशास अर्थ मंत्रालयाने चुकीचे म्हटले आहे.
वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर एक निवेदनपत्र फिरत आहे, ज्यात दावा केला आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता (डीए) आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीआर) जुलै 2021 पासून पुन्हा तयार केले जात आहे. सदर निवेदन चुकीचे आहे. वास्तविक असा कोणताही आदेश भारत सरकारने दिलेला नाही.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत
भारताच्या महिला गटाला सुवर्ण

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला गटाने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारतीय महिला रिकर्व टीमने ही कामगिरी करत इतिहास रचला आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या महिला संघाने अंतिम फेरीत मॅक्सिकोचा पराभव केला. मॅक्सिकोचा ५-१ ने पराभव करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे. ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्वालिफायर फेरीतील पहिल्या टप्प्यात मिळालेल्या पराभवानंतर आलेली निराशा झटकून हे यश मिळवलं आहे. मात्र ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाइंग स्पर्धा नाही.

माजी राष्ट्रपतींना देखील
टाटा समूहाने केली आहे मदत

टाटा समूहाचे संस्थापक अध्यक्ष जेआरडी टाटा लोकांना मदत करण्यासाठी जगभरात ओळखले जायचे. सरकारपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वर्गाला जेआरडींनी मदतीचा हात दिला आहे. पण भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी जेआरडी टाटा यांनी मदत केली होती, ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे. १९९२ मध्ये नारायणन भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती..

३ हजार ६४ प्राध्यापकांची
भरती प्रक्रिया लवकरच

कोरोनाच्या काळात थांबलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इगतपुरी येथील बंगल्यात पार्टी
करणाऱ्या महिला पुरुषांना अटक

इगतपुरी येथील खासगी बंगल्यात १२ महिला – १० पुरुष हे ड्रग्ज व हुक्का पार्टी करत असल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांनी शनिवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारात सदर ठिकाणी छापा मारून सर्वांना ताब्यात घेतले आहे. यातील चार महिला या चित्रपटात अभिनय करत असल्याचे समोर आले आहे. या चार अभिनेत्रीपैकी एक बिग बॉसमध्ये स्पर्धक असलेली अभिनेत्री आहे. तर इतर मराठी व साऊथ फिल्म इंडस्ट्रिजशी संबधित आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.