आज दि.१२ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

अफजलखान व सय्यद बंडाच्या कबर परिसरात आणखी तीन कबरी आढळल्या; महसूल प्रशासनाकडून तपास सुरू

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडले आहे. येथे अफजलखान व सय्यद बंडाच्या कबर परिसरात आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत.याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. यातील एक कबर सेवेकऱ्याची किंवा सरदाराची असण्याची तर दुसऱ्या तिसऱ्या कबरीचा दाखला इतिहासात नसल्याचे सांगितले जात आहे. येथील दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दिलासा! ‘हर हर महादेव’ राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली. त्यानंतर आज ( १२ नोव्हेंबर ) आव्हाडांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

शिंदे गटात सामील होताच गजानन किर्तीकरांचा चंद्रकांत खैरेकडून समाचार

शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किर्तीकर यांनी शुक्रवारी प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांनी किर्तीकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही किर्तीकर यांचा समाचार घेतला आहे.“गजानन किर्तीकर हे आमचे मार्गदर्शक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. आम्हाला घडवण्यामागे किर्तीकर यांचा हात आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी काम केलं. दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार एवढे देऊन सुद्धा गद्दारांबरोबर गेल्याने मला दु:ख झालं,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा

जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका, असं महाजन म्हणाले होते”, ही आठवण करून देत खडसेंनी महाजनांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे, असं खडसे म्हणाले आहेत.

“मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो…”, मोदींचा विरोधकांना खोचक टोला!

आज देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असून तेलंगणामध्ये बोलताना त्यांनी विरोधकांवर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. तसेच, तेलंगणामधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतानाच राज्यात लवकर कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले. तेलंगणाच्या रामगुंडम भागातील बियाणांच्या प्रकल्पाचं यावेळी मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तसेच, तेलंगणामध्ये लवकरच अनेक विकासकामं होणार असल्याची घोषणा मोदींनी केली. यावेळी बोलताना मोदींनी उपहासात्मक शब्दांमध्ये विरोधकांना टोला लगावला. “मी आज सकाळी दिल्लीत होतो. नंतर कर्नाटक, तमिळनाडूमध्ये होतो. रात्री आंध्र प्रदेशमध्ये असेन. आत्ता तेलंगणामध्ये आहे. लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? मी त्यांना समजावलं की हे बघा.. मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो. परमात्म्यानं माझ्यामध्ये अशी रचना केली आहे, की या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरीत होतात. एक सकारात्मक ऊर्जा तयार होते”, असं मोदी म्हणाले.

धक्कादायक! आरे कॉलनीत महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिनाभरातील दुसरी घटना

आरे कॉलनीत बिबट्याची दहशत कायम आहे.  आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संगिता गुरव असे या महिलेचे नाव आहे. त्या काल संध्याकाळी आपल्या घरी जात होत्या. त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संगिता गुरव या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर  ट्रामा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एक दीड वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यानं स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

शाहरूख खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी अन् लाखोंचा भुर्दंड!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. मध्यंतरी तो मुलगा आर्यनच्या  अटकेमुळे चर्चेत होता. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीतून बरेच दिवस झाले गायब आहे. पण ‘पठाण’ चित्रपटातून तो दमदार पदार्पण करणार आहे. पण त्याआधी त्याच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. दुबईहून परतत असताना त्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले तसेच त्याची चौकशी सुद्धा झाली.

शाहरुख खानची गणना भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्यासाठी शाहरुख दुबईत पोहोचला होता. तिथेही त्याने आपल्या खास स्टाइलने सर्वांची मने जिंकली. मात्र दुबईहून परतत असताना त्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. काल रात्री शाहरुख त्याच्या टीमसोबत मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याची जवळजवळ तासभर चौकशी करण्यात आली. शाहरुखला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं.

अत्याचारादरम्यान वारंवार गळा दाबला, पीडितेचा लंकेच्या खेळाडूवर आरोप

ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. श्रीलंकेच्या प्रसिद्ध क्रिकटपटूवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलका सध्या बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी तुरुंगात आहे. एका महिलेनं त्याच्यावर आरोप केल्यानंतर सिडनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. श्रीलंकन क्रिकेटपटूने बलात्कारादरम्यान पीडित महिलेचा वारंवार गळा दाबल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पीडित महिलेने जबाब नोंदवताना याबाबत माहिती दिली.

दनुष्का श्रीलंकेच्या टीमसोबत वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. जखमी झाल्यानंतर मायदेशी परतण्याऐवजी तो टीमसोबत ऑस्ट्रेलियामध्येच राहिला. श्रीलंकेच्‍या टीमने टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 फेरीमध्‍ये प्रवेश केला होता. ही टीम शनिवारी (5 नोव्हेंबर) स्पर्धेतली आपली शेवटची मॅच इंग्लंडविरुद्ध खेळली. या मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला. या मॅचनंतरच पोलिसांनी दनुष्काला अटक केली.

पाकिस्तानी पंतप्रधानांना इरफान पठाणचा करारा जवाब

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून तब्बल 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवामुळे टीम इंडियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आणि वर्ल्ड कप जिंकण्याची संधीही हुकली. पण याच पराभवानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनी मात्र एक ट्विट करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या त्याच ट्विटवर आज  टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणणं रिप्लाय करत सडेतोड उत्तर दिलं आहे.भारताच्या पराभवानंतर शरीफ यांनी ट्विट करत म्हटलं होतं की,  ‘या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार होईल.’ एका अर्थानं हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न होता. कारण गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं भारताला दहा विकेट्सनी मात दिली होती आणि 152 धावांचं आव्हान पार केलं होतं. यंदा इंग्लंडनं सेमी फायनलमध्ये बिनबाद 170 धावा करुन भारताचा पराभव केला. त्याचाच आधार घेत शरीफ यांनी खोचक टिप्पणी केली.

दरम्यान आज इरफान पठाणणं पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला.पठाणनं त्या ट्विटवर रिप्लाय देत म्हटलंय… ‘तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या आनंदात आनंद मानतो आणि तुम्हाला दुसऱ्यांना त्रास झाल्याचा आनंद. म्हणून तुमचा देश सुधारण्यावर भर द्या’ अशा शब्दात इरफाननं सडेतोड उत्तर दिलं.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.