विभागणीनंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये
सर्व राजकीय पक्षांची बैठक
२०१९मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेचं ३७० हे कलम काढून टाकलं आणि राज्याची लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली. या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. काश्मीरमधूनही या निर्णयाला मोठा राजकीय विरोध झाला. सरकारने काश्मीरमधील राजकीय पक्षांसोबत या मुद्द्यावर चर्चा केली नव्हती. मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल आणखी पुढे टाकलं असून विभागणीनंतर पहिल्यांदाच काश्मीरमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना केंद्रानं चर्चेचं आमंत्रण दिलं आहे.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील
अंतर १२-१६ आठवड्याचे असावे
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी ४५ दिवस आणि नंतर ८५ दिवस करण्यात आले. हे अंतर किती असावे याबाबत वेगवेगळे मत प्रवाह आहेत. कोविशिल्ड लस बनविणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२-१६ आठवड्याचे असावे याचा पुनरुच्चार कोरोना प्रतिबंधित लस बनविणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने केला आहे. एका डोसमध्ये मिळणाऱ्या संरक्षणाचा स्तर लस घेतल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात वाढतो.
शिवभोजन थाळीला मुदतवाढ
राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास
जोडीदाराची गैरसोय करू नका
निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा जोडीदार किंवा कुटुंबातल्या सदस्यांची अनावश्यक तपशील आणि कागदपत्रे यासाठी गैरसोय होऊ नये आणि निवृत्तीवेतन लवकरात लवकर वितरीत करण्यात यावी अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाबाबत डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर, त्या व्यक्तीचे निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या बँकेने, त्यांच्या कुटुंबियांना, कौटुंबिक निवृत्तीवेतना साठी आवश्यक नसणारा तपशील आणि कागदपत्रे सादर करायला सांगितल्याची काही प्रकरणे विभागाच्या निदर्शनाला आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विप्रोने जाहीर केली
दुसऱ्यांदा पगार वाढ
विप्रोने करोना काळात कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा चांगली बातमी दिली आहे. कंपनीने पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होईल. २०२१ मध्ये विप्रोने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला आहे. कंपनीच्या घोषणेनुसार ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्यांना लागू असेल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्येही कंपनीने बँड ३ पर्यंतच्या ८० टक्के कर्मचार्यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
नवी मुंबई विमानतळाला
जेआरडी टाटा नाव देण्याची मागणी
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला माजी खासदार दि.बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी कृती समितीकडून केली जात आहे. तर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. मागील काही आठवड्यांपासून हा मुद्दा चर्चेत असून, आता शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार आणि कवी प्रीतीश नंदी यांनी भारतात हवाई प्रवासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जेआरडी टाटा यांचं नाव देण्याची मागणी केली आहे.
भारताचे कोवॅक्सिन प्रभावी
नसल्याचा अमेरिकेचा दावा
भारतात तयार झालेले कोवॅक्सिन प्रभावी नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेत कोवॅक्सिन घेतलेल्या लोकांना दुसऱ्यांदा लस घेण्यास सांगितले जात असल्याने ही भूमिका उघड झाली. अमेरिकेत भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि रशियाचे स्पुटनिक व्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्यांदा लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय टेलिकॉम कंपन्या
चीनच्या निशाण्यावर
भारतासोबत कुरापाती करण्याचे काम चीन अनेक दशकांपासून करीत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये पाकीस्तानच्या सोबत राहून या कुरापाती जास्तच वाढल्या आहेत. आता भारतीय टेलिकॉम कंपन्या आणि अनेक सुरक्षा कॉन्ट्रॅक्टर्स चीनच्या निशाण्यावर आहेत. एका सायबर थ्रेट्स इंटेलिजन्स कंपनीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेतील एका रिपोर्टमध्येही चीनच्या छुप्या ऑपरेशन्सचे पुरावे सापडतात. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या एका विशिष्ट्य युनिटशी चीनचे हे अभियान जुळलेले आहे.
केंद्राच्या पाणीपुरवठा
योजनेकडे 17 राज्यांची पाठ
ग्रामीण भागात नियमित आणि योग्य पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्राने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सहा हजार कोटी रुपये जाहीर केले. परंतु केवळ १५ राज्यांतील प्रस्तावांच्या मंजुरी मुळे ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. याउलट या संदर्भात १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अद्याप कोणताही मसुदा किंवा प्रस्ताव पाठविलेला नाही.
कोयना धरणाच्या पायथा
वीज गृहातून पाण्याचा विसर्ग
मागील काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून कोयना धरण व्यवस्थापनाने २१०० क्येसूक पाण्याचा विसर्ग केला आहे. सध्या धरणात २७ हजार क्यूसेक पाण्याची आवक आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
केंद्र सरकार म्हणते.. स्विस बँकने काळा
पैसा किती हे दाखवलेले नाही
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बँकांनी स्विस नॅशनल बँकेकडे (एसएनबी) नोंदवलेली ही अधिकृत आकडेवारी असून स्वित्झर्लंडमध्ये जमा केलेला कथित काळा पैसा किती आहे हे यात दाखवलेले नाही. या तथ्याचाही माध्यमांनी आडवळणाने उल्लेख केला आहे. शिवाय, या आकडेवारीत भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी स्विस बँकांमध्ये तिसऱ्या देशातील कंपनीच्या नावे जमा केलेल्या पैशाचा समावेश नाही..
आम्हाला स्वबळावर
लढू द्या : भाई जगताप
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं असताना आता मुंबईत देखील काँग्रेसने स्वबळाचा सूर लावला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्वबळावर लढू देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यामुळे काँग्रेसनं राज्यातील सत्ताकाळाला ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच पूर्ण फारकतीचे इशारे दिल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे.
राहुल गांधींचं अभिवादन करणारे ट्विट..
अनेकांनी केली थट्टा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत मिल्खा सिंग यांना अभिवादन केलं. मात्र, राहुल गांधी श्रद्धांजलीपर केलेलं हे ट्वीट वेगळ्याचं कारणाने चर्चेचा विषय ठरले. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये वापरलेल्या एका इंग्रजी शब्दावर आक्षेप घेत त्यांची थट्टा केली.
महान धावपटू
मिल्खा सिंग यांचे निधन
भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत
भारताचे दोन गडी बाद
भारतासह संपूर्ण जग ज्या सामन्याची वाट पाहत होते, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला.
चेन्नईत 9 सिंहांना
कोरोनाची लागण
गेल्या वर्षभरापासून देशातचं नाही संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. माणसांनंतर आता प्राण्यांना देखील कोरोनाची लगाण होत असल्याचं समोर आलं. चेन्नईच्या एका बागेत 9 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नईतील अरिग्यार अन्ना जूलॉजिकल पार्कमधील नऊ सिंह कोरोना पॉझिटीव्ह आढळले. चार सिंहांची चाचणी जीनोम सिक्वेन्सींग भारतीय कृषी संशोधन परिषद – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हाई सिक्योरिटी एनिमल डिसिजेस येथे करण्यात आली.
SD social media
9850 60 3590