हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.
गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं. इतर राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्यात २ हजार ५६ रुग्ण उपचार घेत असून, शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला ३८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुंभमेळ्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे. पहिल्या शाहीस्नानाला ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. तर तिसरं शाहीस्नान बुधवारी होणार आहे.