मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत. त्यानुसार मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमताचे संकेत आहेत. तर त्रिपुरामध्ये दोलायमान स्थिती असून नव्याने उदयास आलेला ‘तिप्रा मोथा’ हा पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतो.
सोमवारी मेघालय आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. मेघालयमध्ये अंदाजे ७५ टक्के तर नागालँडमध्ये ७३ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले मतदानोत्तर चाचणी अहवाल जाहीर झाले.
- त्रिपुरा : इंडिया-टुडे मायअॅक्सिस सर्वेक्षणात भाजपला ६०पैकी ३६ ते ४५ जागांचा मिळण्याचा अंदाज आहे. टाईम्स नाऊने मात्र भाजपला केवळ २४ जागांचा अंदाज वर्तविला आहे.
- मेघालय : टाईम्स नाऊ ईटीजी आणि इंडिया टुडे-माय अॅक्सिस या दोन्ही चाचण्यांमध्ये त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तविली असली तरी मुख्यमंत्री कोर्नाड संगमा यांना विजयाचा विश्वास आहे.
- नागालँड : इंडिया टुडेच्या चाचणीत एनडीपीपीला २८ ते ३४ तर भाजपला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊनेही असाच अंदाज वर्तविला आहे.