कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. जळगाव परिमंडलातील 82 हजार 140 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात 7 हजार 774 जण सहभागी
जळगाव परिमंडलात 15 हजार 463 शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. यात जळगाव जिल्ह्यात 7 हजार 774, धुळे जिल्ह्यात 2 हजार 826 तर नंदुरबार जिल्ह्यातील 4 हजार 863 ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
जळगाव परिमंडलातील 3 लाख 64 हजार 152 शेतकऱ्यांकडे एकूण 5422 कोटी 54 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता 3523 कोटी 30 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील 50 टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास आणखी 1761 कोटी 65 लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे.
या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण 66 टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या 66 टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महा कृषी ऊर्जा अभियानात शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे 66 टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.
आतापर्यंत जळगाव परिमंडलातील 82 हजार 140 शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी 97 कोटी 94 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 43 हजार 345 ग्राहकांनी 59 कोटी 85 लाख, धुळे जिल्ह्यातील 23 हजार 222 ग्राहकांनी 15 कोटी 69 लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील 15 हजार 573 ग्राहकांनी 22 कोटी 40 लाख रुपये वीजबिल भरले आहे. या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे.