बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभेत नुकतंच सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील लोकांच्या प्रेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, की ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांसाठी आरक्षण आणलं. महिला उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आल्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये महिला आल्या. आता आपली इच्छा आहे की, लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसची तर आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नाही. मी सर्वसाधारण ओपन सीटमधून लढणार आहे. मी कुठल्या तोंडाने आरक्षण मागणार आहे? मी शिकली सवरलेली असून ओपन सीटमधून निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे मी आरक्षणामधून उमेदवारी मागणार नाही. पण कुठल्याही महिलेला गरज असेल तर तिच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार आहे. कारण त्यांना तेवढं शिक्षण मिळालं नाही आणि खासदारकीची संधी मिळालेली नाही’.
मी साडी नेसूनच परदेशात फिरते- खासदार सुप्रिया सुळे
न्यूयॉर्कमधील किस्सा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मी ज्यावेळेस परदेशात पॅन्ट घालून रस्त्याने चालते त्यावेळेस कोणी बघत पण नाही. ते म्हणतात कोणीतरी भारतीय मुलगी चालली आहे रस्त्याने. मात्र मी जेव्हा साडी नेसून परदेशात रस्त्यावर उतरते त्यावेळी मला विचारतात, ‘इंडियन’? व्हेरी ब्युटीफुल साडी! हा किस्सा सांगत त्यांनी आपली परंपरा जपण्याचा सल्ला उपस्थित महिला वर्गाला दिला.