कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशभरात घरबांधणी क्षेत्रात पुन्हा तेजी येताना दिसत आहे. एकीकडे ग्राहक खरेदीसाठी उत्साह दाखवत असतानाच बँकांनीही गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे कधी नव्हे तो गृहकर्जाचा व्याजदर साडेसहा टक्क्यांच्या खाली घसरल्याचे चित्र दिसत आहे. गृहकर्ज देणाऱ्या इतर वित्तसंस्थाही हाच कित्ता गिरवताना दिसत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँकेने सणोत्सवानिमित्त गृहकर्जाच्या व्याजदरात 6.40 टक्क्य़ापर्यंत कपात केली आहे. सध्या बँकांकडून उपलब्ध करण्यात आलेला घरासाठी कर्जाचा हा सर्वात स्वस्त व्याजदर आहे. याशिवाय, अनेक बँकांनी सणासुदीच्या काळासाठी 6.50 टक्के दराने कर्ज देणाऱ्या योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये कोटक महिंद्र बँक 6.50 टक्के), सारस्वत बँक (6.50 टक्के), पीएनबी (6.60 टक्के), आयसीआयसीआय बँक (6.70 टक्के), स्टेट बँक (6.70 टक्के), बँक ऑफ बडोदा (6.75 टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र (6.80 टक्के) अशा बँकांचा समावेश आहे.
युनियन बँकेकडून देण्यात येणाऱ्या गृह कर्जाचा दर सर्वात कमी 6.40 टक्के असा आहे. सुधारित दर २७ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. नव्याने कर्ज घेणारे ग्राहक आणि इतर बँकांकडून कर्जाचे हस्तांतरण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 6.40 टक्के दराने कर्ज उपलब्ध असेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि HDFC लिमिटेड यांनी IPPB च्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना गृहकर्ज देण्यासाठी धोरणात्मक युती जाहीर केली आहे. IPPB सुमारे 1,90,000 बँकिंग सेवा प्रदात्यांद्वारे- पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांद्वारे गृहकर्ज देऊ करेल. करारानुसार, सर्व गृहकर्जांसाठी क्रेडिट, तांत्रिक आणि कायदेशीर मूल्यमापन, प्रक्रिया आणि वितरण हे एचडीएफसी लिमिटेडद्वारे हाताळले जाईल, तर आयपीपीबी कर्जाच्या सोर्सिंगसाठी जबाबदार असेल, असे कंपनीने म्हटले आहे.