गुन्हेगारी विश्व जेवढं वाईट आहे तेवढेच थरारक आणि मोठे गुन्हे करणारे लोकदेखील आहेत. कधी एखादा गुन्हेगार काय आणि कसा गुन्हा करणार हे सांगता येत नाही. काही गुन्हेगारी कृत्यांची कहाणी ऐकूण आपल्या अंगावर काटा उभा राहतो. सध्या मात्र एका वेगळ्याच चोरीची चर्चा होत आहे. चोरट्यांनी साडे आठ लाख रुपयांचे हिरे खोटे असल्याचे समजून ते चक्क फेकून दिले आहेत. ही घटना नागपुरात घडली असून हिरे फेकून देऊन त्यांनी सोने लपवून ठेवले होते. सध्या या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. त्यांच्या या अज्ञानाची सगळीकडे चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नयनमुनी मेधी, दिपज्योती मेधी आणि संजू राय या तीन चोरट्यांनी 10 ऑगस्ट रोजी हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गोंदिया या भागात महिलांची पर्स चोरली होती. या चोरट्यांनी दोन महिलांना लुटले होते. यामध्ये एका पर्समध्ये साधारण 19 लाख रुपयांचे सोने तसेच हिरेजडित दागिने होते. तसेच दुसऱ्या महिलेच्या पर्समध्ये 82 हजार रुपये होते. ऐवढा ऐवज चोरून चोटरे फरार झाले होते.
रोख रक्कम वाटून घेतली, हिरे फेकून दिले
मोठा हात मारल्यानंतर या तिन्ही चोरट्यांनी लुटलेली रक्कम आपसात वाटून घेतली. तसेच सोन्यच्या बांगड्या आणि दागिने सोनाराच्या मदतीने वितळूवन घेतले. दागिन्यांसोबतच त्यांनी हिरे वितळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश न मिळाल्यामुळे ते शेवटी फेकून दिले. फेकून दिलेल्या हिऱ्यांची किंमत तब्बल आठ लाख रुपये असल्याची कल्पनादेखील या चोरट्यांनना नव्हती.
पोलिसांनी झर्वेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज तपासले
तीन आरोपींची ही आतंरराज्यीय टोळी रेल्वे प्रवाशांची लूटमार करायची. रिझर्वेशन करुन ते बाकीच्या प्रवासांचे दागिने तसेच पैशांची चोरी करत असत. दोन महिलांना लूटन त्यांनी आसाम राज्यात पळ काढला होता. मात्र नागपूर लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास मोठ्या गांभिर्याने करत होते. त्यांनी रिझर्वेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज, गोंदिया, नागपूर, दुर्गसह अनेक रेल्वेस्थानकांवर चौकसी केली. तपासानंतर पोलिसांना या आरोपींचा सुगावा लागला.
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी आसामला जाऊन या तिन्ही भामट्यांना अटक केलं. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 लाख 60 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. पण चोरट्यांनी फेकून दिलेले हिरेजडित दागिने पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. हिरे खोटे आहेत असे वाटल्यामुळे आम्ही ते फेकून दिले अशी कबुली चोरट्यांनी दिली आहे.