हर्सूल जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रोहिणी बापू वड (वय 15, रा. खडकओहोळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाची ही राज्यात स्थापन झालेली पहिली आश्रम शाळा आहे.
रोहिणीने रविवारी दुपारी आत्महत्या केली. खरे तर या दिवशी शाळेला सुट्टी होती. तिच्या सर्व मैत्रिणी आणि इतर विद्यार्थिनी जेवणासाठी निघाल्या होत्या. मात्र, रोहिणी त्यांच्यासोबत गेली नाही. तिने मैत्रिणीला आपल्यासाठी डबा घेऊन ये, असा निरोप दिला. त्यानंतर पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला. तिच्या मैत्रिणी जेवण करून आणि तिच्यासाठी डबा घेऊन आल्या. तेव्हा रोहिणीने दरवाजा उघडला नाही.
रोहिणीच्या मैत्रिणी तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आल्या. तिने तिच्या खोलीवर थाप मारली. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. आतून कडी लावलेली होती. विद्यार्थिनींनी बराच वेळ प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा रोहिणीने गळफास घेतल्याचे उघड झाले. पोलीस पाटील व पोलीस उपनिरीक्षकांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
रोहिणी अभ्यासात हुशार होती. मात्र, तिचे खडकओहोळ हे गाव बोरीपाडा आश्रमशाळेपासून आठ किलोमीटर दूर होते. त्यात शाळा सुरू झाल्या आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संपही. त्यामुळे रोहिणीची शाळा बुडत होती. तिचे आई-वडील शेतमजूर आहेत. लेकीला रोज शाळेत सोडण्यासाठी त्यांच्याकडे वाहन नव्हते. त्यामुळे तिचा अभ्यास बुडू म्हणून त्यांनी तिला या आश्रमशाळेच्या वसतिगृहात ठेवले होते. मात्र, तिने आत्महत्या केली.