ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी तीन दिवसांच्या आत भारतावर नऊ गडी राखून दमदार विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले आणि या विजयासह त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित केले.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेले ७६ धावांचे लक्ष्य त्यांनी एक गडी गमावून पूर्ण केले. या विजयानंतर आता ऑस्ट्रेलिया मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. ट्रॅव्हिस हेड (नाबाद ४९) आणि मार्नस लबूशेन (नाबाद २८) यांनी डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाला १८.५ षटकांत विजय मिळवून दिला. गेल्या सहा वर्षांतील भारतात मिळवलेला हा ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय आहे. भारताचा मायदेशात गेल्या १० वर्षांतील हा केवळ तिसरा पराभव आहे. भारताला ९ मार्चपासून अहमदाबाद येथे सुरू होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या योजनांवर पुन्हा नव्याने मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. मालिकेत तयार करण्यात आलेल्या खेळपट्टय़ांवर टीका झाली आहे. त्यामुळे भारत फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीला प्राथमिकता देणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असेल. भारतीय फलंदाजही या खेळपट्टय़ांवर संघर्ष करताना दिसले. भारताला आपल्या दोन्ही डावांत १०९ आणि १६३ धावाच करता केल्या.
ऑस्ट्रेलिया संघ नागपूर आणि दिल्ली येथील दुसऱ्या डावात अडखळला, त्यावरून शुक्रवारी पहिल्या सत्रात काहीही होऊ शकते, असे दिसत होते. ७६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला रविचंद्रन अश्विनने दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करत झटका दिला. ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दबावात होता. मग लबूशेनने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारत दबाव कमी केला. हेड आणि लबूशेन आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. मात्र, दोघांनीही अधिक जोखीम न घेता सुरुवातीच्या १० षटकांत केवळ १३ धावा केल्या. डावाच्या दहाव्या षटकात चेंडू बदलल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. अश्विन या नवीन चेंडूने समाधानी नव्हता आणि हेडने त्याच्या षटकात चौकार व षटकार मारत आपले मनसुबे स्पष्ट केले. हेड व लबूशेन यांनी नंतर जडेजाविरुद्ध चौकार लगावले आणि सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड निर्माण केली. लबूशेनने चौकार लगावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांना रोहितचा पाठिंबा
कर्णधार रोहीत शर्मा भारतातील फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांना पाठिंबा देताना म्हणाला, की या खेळपट्टय़ा आमची ताकद आहे आणि या खेळपट्टय़ांवर संघर्ष करत असलेल्या फलंदाजांना यामधून मार्ग काढावा लागेल. ‘‘ मालिकेपूर्वी आम्ही कशा खेळपट्टय़ांवर खेळायचे आहे हे ठरवतो. अशा खेळपट्टय़ांवर खेळण्याचा निर्णय आमचा होता. आम्ही फलंदाजांवर दबाव निर्माण करत आहोत असे मला वाटत नाही. जेव्हा जिंकतो तेव्हा सर्वकाही चांगले वाटते. जेव्हा आम्ही पराभूत होतो, तेव्हा आमच्या फलंदाजीबाबत चर्चा केली जाते. या खेळपट्टय़ांवर आम्हाला आव्हान मिळेल याची कल्पना आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. खेळपट्टीबाबत खूप अधिक चर्चा होत आहे आणि आम्ही भारतात खेळतो तेव्हा लक्ष केवळ खेळपट्टीवर असते,’’ असे रोहित म्हणाला.
होळकर मैदानाच्या खेळपट्टीला ‘निकृष्ट’ दर्जा
भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी होळकर मैदानावर वापरण्यात आलेली खेळपट्टी ‘निकृष्ट’ दर्जाची असल्याचा शेरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ गडी राखून जिंकला. या निर्णयामुळे इंदूर कसोटी केंद्राला तीन दोषांक मिळाले आहेत. या कसोटीत भारताचा पहिला डाव १०९, तर दुसरा डाव १६३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या. तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाने १ बाद ७८ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करून ‘आयसीसी’ला आपला अहवाल सादर केला. खेळपट्टीच्या मूल्यांकनानंतर या केंद्राला तीन दोषांक देण्यात आल्याचे ‘आयसीसी’ने निवेदनातून जाहीर केले. हा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पाठवण्यात आला असून, त्यांना १४ दिवसांत या अहवालाला आव्हान देता येईल.
‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी भारताला विजय अनिवार्य
ऑस्ट्रेलियाकडून इंदूर कसोटीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या पात्रतेसाठी ९ मार्चपासून अहमदाबाद येथे होणारा चौथा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियाने इंदूर येथे विजय मिळवत ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्याची पात्रता मिळवली. तेथे त्यांच्यासमोर भारत किंवा श्रीलंका यांचे आव्हान असेल. भारताने बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला नमवले तर त्यांना अंतिम सामन्यात पात्रता मिळेल. अखेरच्या कसोटीत भारत पराभूत झाला किंवा सामना अनिर्णित राहिला, तर भारताला श्रीलंकेच्या न्यूझीलंड दौऱ्यावर लक्ष ठेवावे लागेल. भारताला सामना जिंकता आला नाही आणि श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० असे नमवले तर श्रीलंका अंतिम फेरी गाठेल.
संक्षिप्त धावफलक
- भारत (पहिला डाव) : ३३.२ षटकांत सर्व बाद १०९
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७६.३ षटकांत सर्व बाद १९७
- भारत (दुसरा डाव) : ६०.३ षटकांत सर्व बाद १६३
- ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १८.५ षटकांत १ बाद ७८ (ट्रॅव्हिस हेड नाबाद ४९, मार्नस लबूशेन नाबाद २८; रविचंद्रन अश्विन १/४४)