शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी सांगलीत बोलताना निवडणूक आयोगावर खालच्या शब्दांत टीका केली होती. शिवसैनिकांनी उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहे, तुम्ही ज्यांना निवडून दिलं, ते ५० खोके देऊन पळून गेले. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे. तुमच्या बापाची आहे का भो****?, असं संजय राऊत म्हणाले होते. या वक्तव्यावरून शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.
“संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. चटणी-भाकर खाऊनच आम्ही आमदार झालो आहोत. संजय राऊतांसारखे उपरे आम्ही नाही. राऊतांनी कोणत्याही मोर्चात सहभाग घेतला नसून, नेतृत्व करणं वेगळं आणि जमिनीवर काम करणं वेगळं असतं. राऊत हे आयत्या बिळावर नागोबा झालेले शिवसैनिक आहेत,” अशी टीका संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर केली आहे.
“संजय राऊतांना एकतर वेड्याच्या दवाखान्यात दाखल केलं पाहिजेल किंवा…”
“महाराष्ट्राला माहिती आहे, कोण कुठं पळालं. पण, संजय राऊतांनी आपली हद्द पार केली. निवडणूक आयोगाला संजय राऊत खालच्या भाषेत बोलले आहेत. निवडणूक आयोगाला दिलेली शिवी उद्या राऊतांना दिली, तर त्याचा परिणाम काय होईल. तुम्हाला किती ती टोचेल. म्हणून संजय राऊतांना एकतर वेड्याच्या दवाखान्यात दाखल केलं पाहिजेल किंवा जेलमध्ये,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे.
“दलाली करण्याचे पैसे मिळतात, म्हणून…”
“निवडणूक आयोगाने २ हजार कोटी, तर आम्ही ५० खोके घेतल्याचं सांगतात. याचे संजय राऊतांनी पुरावे द्यावेत. शरद पवारांच्या इशाऱ्यावर संजय राऊत बेछुट आरोप करतात. त्यांना दलाली करण्याचे पैसे मिळतात, म्हणून ते दुसऱ्यांवर आरोप करतात. शिवसेनेची आजची अवस्था दलालामुळे झाली आहे,” असं संजय शिरसाटांनी म्हटलं.
“संजय राऊतांबाबत हक्कभंग दाखल झाला”
“विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना संजय राऊत चोर म्हटलं आहेत. त्यासंदर्भात हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे. याची खोलपर्यंत जाऊन चौकशी करणार आहोत. त्यानंतर संजय राऊत काही दिवसांनी निश्चितच जेलमध्ये दिसतील, हे नक्की,” असा इशारा संजय शिरसाटांनी दिला आहे.