टीईटी परीक्षा प्रकरणातील सर्वाधिक अपात्र परीक्षार्थी नाशिक जिल्ह्यातील

पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. आता यामध्ये नाशिकमधून मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (वय 23) याला अटक करण्यात आली असून 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यातील एक आरोपी राजेंद्र सोळुंके आणि मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत.

मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधला रहिवासी आहे. जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने इतरांशी संगनमत करुन तब्बल 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील एका एजंटकडील तब्बल 1 हजार 126 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्या 7 हजार 880 अपात्रांपैकी सर्वाधिक 2 हजार 770 अपात्र परीक्षार्थी नाशिक विभागातले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते.त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याला देण्यात आले.

जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याने टीईटी 2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला दिले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे याला 20 लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.