हिंदी चित्रपटसृष्टीची स्वप्नसुंदरी म्हटली की असंख्य चाहत्यांच्या समोर चटकन देखणा चेहरा उभा राहतो, अर्थात तो चेहरा म्हणजे अभिनेत्री मधुबाला. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने असंख्य चित्रपट रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री. मधुबाला अर्थात मुमताज जहान बेगम नहलवी हिची आज 89 वी जयंती. ती बेबी मुमताज म्हणूनही परिचित होती.
ह्या स्वप्नसुंदरीचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव मुमताज जहाँ देहलवी होते. 1942 मध्ये ‘बसंत’ चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरची सुरुवात केली. मधुबाला दिसायला जेवढी सुंदर होती, तितकीच ती एक उत्तम अभिनेत्री होती. तिचा अभिनयही प्रचंड दमदार होता. त्यामुळे सौंदर्य आणि त्याला उत्तम अभिनयाची साथ अशा जोरावर मधुबालाने चित्रपटसृष्टीतील असंख्य चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. तिचे मधुबाला नाव पडण्यामागेही किस्सा आहे. 1947 मध्ये ‘नील कमल’ चित्रपटातील तिचा अभिनय पाहून त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी यांनी तिचे नाव ‘मधुबाला’ ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून ती मधुबाला म्हणून प्रसिद्ध झाली.
मधुबालाच्या सौंदर्याची 1940च्या दशकात असंख्य चाहत्यांवर जेवढी भूरळ होती, तितकीच भुरळ आजही कायम आहे. ही अभिनेत्री आज या जगात नाही, मात्र लोक आजही तिला विसरु शकलेले नाहीत. मधुबालाने मुगल-ए-आझम या चित्रपटात साकारलेली ‘अनारकली’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
मधुबालावर बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दाम्पत्याचे मधुबालावर विशेष प्रेम होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेल्या नव्हत्या. त्यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. 1942 मध्ये ‘बसंत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे नऊ वर्षे होते. अभिनेत्री म्हणून 1947मध्ये ‘नीलकमल’ या चित्रपटात त्या पहिल्यांदा झळकल्या होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘दिल की रानी’ हा त्यांचा दुसरा चित्रपट, तर 1948 मध्ये ‘अमर प्रेम’ चित्रपट प्रदर्शित झाला.
या सर्व चित्रपटांमध्ये मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. मधुबाला यांना एकूण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला या आईवडिलांची पाचवी मुलगी होत्या. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांना उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एक शब्दही बोलता येत नव्हता.