भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका
पहिल्या सामन्यात ३५० धावांची मजल मारल्यानंतरही विजयासाठी झुंजावे लागल्यानंतर भारतीय संघ शनिवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कामगिरी उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या सामन्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी शार्दूल ठाकूर आणि उमरान मलिक यांच्यात स्पर्धा आहे.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना होणार असून ६० हजारांहून अधिक चाहत्यांचा भारतीय संघाला पाठिंबा लाभणे अपेक्षित आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज पहिल्या सामन्यापेक्षा चांगली कामगिरी करतील अशी भारताला आशा असेल.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर शुभमन गिलच्या झंझावाती द्विशतकाच्या बळावर भारताने ८ बाद ३४९ अशी विशाल धावसंख्या उभारली होती. मात्र, गिलला अन्य फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाच केवळ ३० धावांचा टप्पा ओलांडता आला. त्यामुळे अन्य फलंदाजांनी आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे. गोलंदाजीत भारताने चांगली सुरुवात करताना न्यूझीलंडची ६ बाद १३१ अशी स्थिती केली होती. मात्र, त्यानंतर मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांची फटकेबाजी रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना बराच संघर्ष करावा लागला. भारताने हा सामना केवळ १२ धावांनी जिंकला. या सामन्यात मोहम्मद सिराजने (४/४६) अप्रतिम गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यासाठी त्याच्यासह मोहम्मद शमीचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. मात्र, तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ठाकूर आणि मलिक यांच्यापैकी कोणाला पसंती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ठाकूरने पहिल्या सामन्यात ७.२ षटकांत ५४ धावा दिल्या होत्या; परंतु त्याने अखेरच्या षटकात ब्रेसवेलला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. तसेच तो फलंदाजीतही सक्षम असल्याने त्याला पुन्हा संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. दुसरीकडे, तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिकने श्रीलंकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांत पाच बळी मिळवले होते. तसेच त्याने मधल्या षटकांत सातत्याने १५० ताशी किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते.त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला अंतिम ११ मध्ये स्थान न मिळाल्याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता त्याला दुसऱ्या सामन्यात संधीची आशा असेल.