स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांच्या निवृत्तीवेतनात दहा हजार रुपयांची वाढ करुन ते २० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
सीमा आंदोलनात ज्या व्यक्तींनी बलिदान दिले, त्यांना हुतात्मे म्हणून घोषित करण्यात आले व त्यांच्या कुटुंबियांना ( हयात विधवा पत्नी, आई व वडिल यांपेकी एक) निवृत्तीवेतन देण्याचा १९९७ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी १ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जात होते. पुढे त्यात वेळोवेळी वाढ करुन २०१४ पासून ते मासिक १० हजार रुपये करण्यात आले. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृतीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २२ नोव्हेंबर २०२२ पासून स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दहा हजार रुपयांनी वाढवून ते २० हजार रुपये करण्यात आले. त्यांच्याप्रमाणेच सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणारे निवृत्तीवेतन २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा हजार रुपयांनी करण्यात आलेली वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे.