अनिल देशमुख यांची सीबीआयच्या
विरोधातील याचिका फेटाळली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयनं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे हा देशमुख यांच्यासोबतच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या ठाकरे सरकारला देखील मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे सीबीआयचा या प्रकरणात सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईसह पुणे, नाशिक, विदर्भातील
काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्यानं मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कसारा घाटात दरड कोसळली
नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
कसारा घाटात दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे कर्जत बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान रुळावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने या दोन्ही स्थानका दरम्यान रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. बदलापूर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. मात्र अंबरनाथहुन मुंबईच्या दिशेने लोकल सेवा सुरु आहे.
अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे
चिपळूनमध्ये दाणादाण
अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूनमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.
मदनपूर परिसरातील रोहिंग्यांचा कॅम्प
उत्तर प्रदेश सरकारने केला जमीनदोस्त
राजधानी दिल्लीमधील मदनपूर खादर परिसरामध्ये उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या जमीनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या झोपड्या गुरुवारी पाडण्यात आले. जलसिंचन विभागाच्या मालकीच्या या जमीनीवर बेकायदेशीर रित्या रोहिंग्यांचा कॅम्प उभारण्यात आला होता. यावरच योगी सरकारने बुलडोझरने कारवाई करत जमीन मोकळी करुन ताब्यात घेतली आहे. जमीनीची किंमत १५० कोटी रुपये इतकी असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
आरोग्य संघटनेची योजना
चीनने फेटाळून लावली
करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीची जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) योजना चीनने गुरुवारी फेटाळून लावली, ज्यामुळे चीनच्या प्रयोगशाळेत तपासणी करता येणार नाही, असे एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. डब्ल्यूएचओने या महिन्यात वूहान शहरातील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेच्या माहितीसह चीनमधील करोना व्हायरसच्या उत्पत्तीचा अभ्यासाच्या दुसरा टप्प्याचा प्रस्ताव दिला होता.
करोना संपत नाही, तोपर्यंत
अन्न घेणार नाही
करोनाने देशात हाहाकार केला आहे. दरम्यान करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका मंत्र्याने ‘भीष्म प्रतिज्ञा’ घेतल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत देशात करोना साथीचा त्रास संपत नाही, तोपर्यंत ते अन्न घेणार नाहीत. तसेच गेल्या ५ वर्षांपासून भोजन घेत नसल्याचे भाजपा मंत्र्याने सांगितले आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी ही शपथ घेतली आहे.
निलंबनाच्या कारवाईविरोधात
१२ आमदारांची न्यायालयात धाव
अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. तर, निलंबित १२ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन, ही एकतर्फी कारवाई झाली असल्याची तक्रार करत, योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. आता या १२ आमदारांनी निलंबनाच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भविष्यात Flash Sale होणार बंद
ऑनलाईन शॉपिंगवरील डिस्काऊंट आणि फ्लॅश सेलवर निर्बंध घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. कारण, एका सर्वेक्षणानुसार, देशातील 72 टक्के ग्राहकांनी ई-कॉमर्स वेबसाईटसवरील फ्लॅश सेलवर निर्बंध घालण्यास विरोध नोंदवला आहे. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करु नये, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
भारतीय उद्योजकांची चिनी
उत्पादनांवर बहिष्कार मोहीम
गेल्या वर्षी भारतीय व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या चिनी मालाच्या बहिष्कार मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून पुन्हा सुरू केलाय. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केलीय. त्यात डिसेंबर 2021 पर्यंत चिनी उत्पादित वस्तूंची आयात भारतात एक लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचे लक्ष्यही ठेवलेय.
राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरचे
‘काळेधंदे’ उघड होणार?
पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस हे सर्व्हर खंगाळून काढून कुंद्रा यांच्या डर्टी पिक्चरचे काळेधंदे उघड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जलयुक्त शिवार योजनेत गैरप्रकार
झाल्याचा अहवालात ठपका
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचा अहवालात ठपका असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. जलयुक्त शिवारमधील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय.
SD social media
9850 60 3590