द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारताच्या 15व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. भारताच्या राष्ट्रपतींना नेमका पगार किती मिळतो? पगारासोबतच त्यांना आणखी कोणते बेनिफिट्स दिले जातात? याबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यावर एक नजर टाकूयात.
राष्ट्रपतींचा पगार
द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील तेव्हा त्यांना महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळेल. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वाधिक पगार घेणारे असतात. याआधी राष्ट्रपतींना मिळणारा पगार 1,50,000 एवढा होता, पण नंतर ही रक्कम 5 लाख पर्यंत वाढवण्यात आली. राष्ट्रपतींना मिळणारे इतर भत्ते पगारामध्ये जोडले गेलेले नाहीत. मला 5 लाख रुपये पगार मिळत असला तरी यातली बरीच रक्कम ही आयकर म्हणून भरावी लागते, असं दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले होते.
कुठे राहणार राष्ट्रपती?
राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा अधिकृत पत्ता राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली, दिल्ली-110004 असेल. राष्ट्रपती भवनाची इमारत 1929 साली बांधण्यात आली. राष्ट्रपती भवनामध्ये 340 खोल्या आहेत, यामध्ये राष्ट्रपतींचं घर, पाहुण्यांसाठीच्या खोल्या आणि इतर कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनामध्ये बऱ्याच बाग बगिचेही आहेत. याशिवाय राष्ट्रपतींना सुट्टीवर जाण्यासाठी शिमल्याच्या मशोब्रामध्ये द रिट्रीट बिल्डिंग आणि हैदराबादमध्ये राष्ट्रपती निलायाम आहे.
राष्ट्रपतींची कार
राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या कार प्रीमियम असतात, तसंच त्या बुलेटप्रुफ आणि शॉकप्रुफही आहेत. राष्ट्रपतींच्या कारला लायसन्स प्लेटही नसते. रामनाथ कोविंद हे मर्सिडिज मेबॅक S600 पुलमॅन गार्डने प्रवास करतात. या कारवर बुलेट, बॉम्ब, गॅस ऍटेक आणि इतर स्फोटकांचा कोणताही परिणाम होत नाही.
राष्ट्रपतींची सुरक्षा
राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड भारतीय लष्कराचं एलिट युनिट असतं. देशाच्या तिन्ही दलांमधल्या सर्वोत्तम जवानांवर राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी असते.