महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी माहुरगडावरिल श्री. रेणुका एक जागृत शक्तिपीठ. तिला एकवीरा देवी असेही म्हणतात. रेणुका मातेला परशुरामाची आई म्हणून ओळखले जाते. तिचे वास्तव्य असलेले मंदिर अत्यंत प्राचीन म्हणजे तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. देवीच्या मंदिरासह गडावर श्रीदत्त, अनुसयामाता, कालिकामाता, परशुरामांचेही मंदिर आहे.
कथा अशी..
एका कथेनुसार माता पार्वतीने खुब्जु देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. त्याचे तिचे नाव रेणू ठेवले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषींसोबत तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य विद्याग्रहण करत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनु जमदग्नी कडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नी कडे कामधेनुची मागणी केली. ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही. पराक्रमी जमदग्नींचा पुत्र परशुराम आश्रमात नाही. हे पाहून सहस्त्रार्जूनने आश्रमावर हल्ला केला. आश्रम व्यवस्था आणि आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नी ना त्याने ठार केले. कामधेनु हिरावून घेतली. पुत्र परशुरामाने घडलेला प्रकार पाहून क्षत्रियांचा विध्वंस करायची प्रतिज्ञा घेतली. पित्याला अग्नी देण्यास कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात त्यांचा मृतदेह आणि दुसऱ्या पारड्यात मातेला बसवले.भटकत तो माहूरगडावर आला. तेथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयांनी त्याला कोरी भूमी दाखवली आणि इथेच त्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले.
परशुरामांनी प्रथम बाण मारून मातृतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून पित्यावर अग्निसंस्कार केले त्यावेळी माता रेणुका सती गेली. श्रीदत्तात्रेयांनी सर्व विधिंचे पौरोहित्य केले. परशुरामांना आईच्या आठवणीने दुःखी होऊ लागले शोक करीत राहिले. त्यावेळी आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून बाहेर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस. पण उत्सुकतेपोटी परशुरामाने मागे वळून पाहिले. त्यावेळी मातेचे केवळ मुख जमिनीतून बाहेर आल्याचे त्याला दिसले. या तांदळा रूपातील मुखाची आजही माहूरला पूजा होते. परशुरामांना या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापुर असे म्हणतात.
माहूर क्षेत्राचा महिमा..
कृतयुगात आम्लिग्राम, त्रेताल युगाच सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगरआणि आता म्हणजे कलियुगात हे माहूर गड पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तिर्थक्षेत्राची आख्यायिका अशी, श्रीविष्णुंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीचा आदेश दिला. ब्रह्मादेवाने एकदाच संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली नाही तर त्याने सृष्टीचा एक नकाशा तयार केला. तो नकाशा म्हणजे माहूरक्षेत्र. सर्व सृष्टीचा आधार देण्याआधी श्रीविष्णुंनीने माहूरक्षेत्राला सुदर्शन चक्राचा आधार दिला होता. ही रचना बघून मग ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी निर्माण केली. माहूरक्षेत्रावर सात कोस लांब आणि रुंद असे चार दरवाजे आहेत. गडाच्या तिन्ही बाजूने पैनगंगा नदीचा वेढा आहे. देविचा गाभारा लहान असुन प्रवेशद्वार दक्षिणमुखी आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिराचे सभामंडप फार मोठे नाही पण मंदिराच्या बाहेरचे आवार तसे मोठे आहे. आवारात यज्ञकुंड आहे. पिंपळाच्या झाडाखाली जमदग्नींचे शिवलिंग आहे. तिथून मातेच्या मंदिरा गाभाऱ्यात प्रवेश होतो. देवीला आवडणारे तांबूल अर्थात पाच- पन्नास- शंभर विडे एकाच वेळेस कुटण्यासाठी जागोजागी मोठमोठे दगडी खलबत्ते आहेत. शेंदूरचर्चित रेणूकेची तेजोमय मूर्ती गळ्यापासून वर आहे. शेजारी अखंड नंदादीप तेवत असतो. भरजरी साडी, शिरावर मुकुट,, नाकात नथ कार्ण कुंडले आणि इतर सर्व अलंकारांनी नटलेल देवी स्वरुप डोळे भरून बघतच रहावेसे वाटते.
माहूर गडावर देवीचा नऊ दिवस जागर
नवरात्रीचे नऊ दिवस देवीचा जागर सुरू असतो. कुलस्वामिनीच्या दर्शनाच्याओढीने देशभरातून भाविक येतात,मनोभावे पूजा, अभिषेक, मानस पूजा करतात. भजन, आरत्य, कीर्तनातून आईचा महिमा गातात, तिची स्तुती करतात. सुवासिनी खणा नारळाची ओटी भरतात. देवीला वडा पुरणाचा नैवेद्य अर्पण करून कृतकृत्य होतात.
आणखी एक आख्यायिका अशी
देवीच्या जन्माची अजून एक आख्यायिका अशी आहेकी एका राजाने यज्ञ केला त्यातून एक मुलगी प्रकट झाली. राजाने तिचे नाव रेणुका ठेवले. गुरु अगस्तीऋषींनी राजाल मुलीचे लग्न जमदग्नी ऋषी सोबत लावून देण्याचे सुचविले, गुरूंची आज्ञा मानून रेणुका चे लग्न सर्व देवीदेवतांच्या साक्षीनेजमदग्नींशी झाले. तिला पाच मुलं होती. एकदा रेणुका नदीवर पाणी भरायला गेली. तिथे चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियांसह जलविहार करण्यासाठी आला होता. त्याचं रूप, त्याचा विलास पाहून रेणुकेचे मन बावरले.ती जलविहार बघत राहिली. भानावर आल्यावर लगबगीने घरी परतली. अंतर्ज्ञानी पती जमदग्नीने तिची चलबिचलता ओळखली. ते संतप्त झाले. क्रोधित होऊन त्यांनी मुलांना आपल्या मातेचा शीरच्छेद करा अशी आज्ञा केली. एकाही मुलाचे धाडस झाले नाही. परशुरामांनी मात्र पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि मातेचा शिरच्छेद केला. त्यावेळी जमदग्नी संतुष्ट होऊन परशुरामाला म्हणाले, तुला हवा तो वर माग. त्यावेळी परशुरामांनी मला माझी माता परत मिळावी असा वर मागितला. वडिलांनी पुत्राची इच्छा पूर्ण केली आणि रेणुकामाता जिवंत झाली. सर्व पातकांचा नाश करणाऱ्या, श्रद्धा-भक्तीने आम्ही जिथे नतमस्तक होतो, तिच ही माहुरगड वासिनी रेणुका माता.
सौ. अंजली हांडे, जळगाव