उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 10 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील (West Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक जागांवर त्रिशंकू लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात 623 उमेदवारांत 15 निरक्षर
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांबाबत एडीआरने काही दिवसांपूर्वीच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या 623 उमेदवारांपैकी 15 उमेदवार निरक्षर आहेत. तर 58 उमेदवार हे केवळ साक्षर आहेत. 10 उमेदवार असे आहेत ज्यांनी केवळ 5 वी पर्यंतचंच शिक्षण घेतलं आहे, तर 62 उमेदवारांनी 8वी पर्यंतचं, 65 उमेदवारांनी 10 वी पर्यंतचं आणि 102 उमेदवारांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.