आंबा म्हणजे भारतीयांसाठी अगदी जवळचा विषय, म्हणून तर त्याची आपल्या देशाचा राष्ट्रीय फळ म्हणून ओळख आहे. आंब्याचे अनेक प्रकार भारतात पाहायला मिळतात. त्यात हापूस आंब्याला भारतातच काय तर अख्या जगात मागणी आहे. यामुळेच तुम्हाला हापूस अंबा घ्यायचा असेल, तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे? की हापूस आंब्या व्यतिरिक्त आणखी एका आंब्याच्या प्रजातीला मागणी आहे. त्याची किंमतही हापूस आंब्यांपेक्षा जास्त आहे.
हा आंबा आहे ‘नूरजहां आंबा’ गेल्यावर्षी या आंब्याने सगळ्यांना निराश केले होते. परंतु यावेळी चांगल्या हवामानामुळे पीक देखील चांगले मिळाले आहे आणि हा आंबा पिकण्या आधीच याला इतकी मागणी आली की, तो झाडावरच बुक झाला.
इंदूरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या काठीवाड्यातील आंबा उत्पादक शिवराजसिंह जाधव म्हणाले, “माझ्या बागेत तीन नूरजहां आंब्याच्या झाडावर एकूण 250 फळे आहेत. ज्यांचे बुकिंग झाडावरच केले गेले आहे. लोकांनी या नूरजहांच्या आंब्याला 500 ते 1000 रुपये मोजले आहेत.”
पुढे जाधव म्हणाले, यावेळी नूरजहां आंब्याच्या फळांचे वजन अडीच ते साडेतीन किलो दरम्यान आहे. विक्रीसाठी नूरजहां आंबा बुक करणार्या लोकांमध्ये मध्य प्रदेश तसेच शेजारच्या गुजरातमधील आंबा प्रेमींचा समावेश आहे.
फळ उत्पादन तज्ज्ञांनी सांगितले की, नूरजहांच्या झाडांची फुले सहसा जानेवारी-फेब्रुवारीपासून फुलायला लागतात आणि त्यांची फळे जूनच्या सुरूवातीला विक्रीसाठी तयार असतात. नूरजहांची फळे एक फूट लांब वाढू शकतात आणि त्यांच्या बाट्याचे वजन 150 ते 200 ग्रॅम पर्यंत असते.