राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात डेल्टा प्लसची एकूण रूग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे. यात मुंबईत 7, पुण्यात 3, नांदेड, गोंदिया, रायगड आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 तर चंद्रपूर, अकोल्यात एक-एक रूग्ण वाढला आहे.
राज्यात काल, 5,560 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि काल नवीन 6,944 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,66,620 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 64,570 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.82 टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिक सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बैठक घेतली आहे. कोरोना चाचण्या वाढवण्याचा आणि प्रत्येक बाधितांच्या संपर्कातील 20 व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. सात परिमंडळ आणि 24 विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पालिकेने खाटांची संख्या देखील वाढवली आहे.
दरम्यान, दुहेरी लसवंतात महाराष्ट्र प्रथम आहे. कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. पण दोन्ही मात्रा घेतलेल्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. एकूण लसीकरणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रात तब्बल एक कोटी 22 लाख नागरिकांनी लस घेतली आहे.