जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्याच्या परतूर शहरात एका गल्लीचं नाव थेट ‘पाकिस्तान गल्ली’ असं ठेवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. परतूर नगरपरिषदेने मालमत्ता कर वसुलीसाठी दिलेल्या पावतीवर पाकिस्तान गल्ली असा उल्लेख करण्यात आला आहे. परतूर नगरपरिषदेच्या या कृतीवर भाजप नेते आणि माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
“परतूर नगरपरिषदेने अतिशय क्लेशदायक कृती केली आहे. परतूर शहरातील एका गल्लीला चक्क पाकिस्तान गल्ली असे नाव देऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी तात्काळ गंभीर दखल घेऊन शासन आणि प्रशासनाने संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हे दाखल करावा. आरोपींवर तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
“गेल्या पंचवीस वर्षांपासून परतुरची नगरपालिका काँग्रेसच्या हाती आहे. अशा प्रकारचे हे षड्यंत्र झाल्याने काँग्रेसला काय परतूर शहरात पाकिस्तान निर्माण करायचा आहे का?”, असा संतप्त सवाल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे.
“विकासाच्या बाबतीमध्ये बोंबाबोंब, स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीही भूमिका न घेणारी नगरपालिका, त्याचबरोबर पंधरा-पंधरा दिवस नगरपालिकेच्या नळाला पाणी येत नाही. या सर्व प्रश्नांना सोडून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र ज्यांनी कोणी रचल आहे त्यांना शासन-प्रशासनाने मोकळं सोडू नये”, अशा तीव्र शब्दांमध्ये आमदार लोणीकर यांनी या कृतीचा धिक्कार केला आहे.