भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारी रात्री राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळवण्यात आला. पण या सामन्यात सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना घडली. आणि सोशल मीडियासह क्रीडाविश्वातही त्याची चर्चा झाली. त्याचं झालं असं की तहिला मॅकग्रा या ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला रविवारी सकाळीच कोरोनाची हलकी लक्षणं दिसत होती. सामन्याआधी जेव्हा तिची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आढळली आणि ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं.
मॅकग्रा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरात
पण महत्वाची बाब ही की जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा तहिला मॅकग्राचा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांसाठी ही बाब भुवया उंचावणारी ठरली. खेळ सुरु झाल्यानंतर ती ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नव्हे तर दुसरीकडे बसलेली दिसली. यावेळी तिनं चेहऱ्यावर मास्कही लावला होता. त्यामुळे एकच चर्चा सुरु झाली. ऑस्ट्रेलियातचे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर ती मैदानातही आली. पण फारसा प्रभाव पाडू शकली नाही. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अवघ्या दोन धावा काढून ती बाद झाली.
कोरोना पॉझिटिव्ह असताना खेळली कशी?
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असताना एखादी खेळाडू मैदानात कशी काय खेळू शकते असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण सामना सुरु होण्यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियानं सामनाधिकारी आणि इतर तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. आणि त्यानंतरच मॅकग्राला खेळण्याची परवानगी मिळाली. आयसीसीनंही मॅकग्राला खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे मॅकग्रा या सामन्यात खेळू शकली. पण खेळतानाही कोरोनासंबंधीचे काही प्रोटोकॉल्स पाळणं तिच्यासाठी बंधनकारक होतं. मात्र या सगळ्यादरम्यान बराच वेळ गेला आणि त्यामुळे सामन्याला उशीरानं सुरुवात झाली.
रविवारी (७ ऑगस्ट) महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर, भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.