2024 ला मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार : अमित शहा

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका जवळ आली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. ही निवडणूक जिंकण्यासाठी सपा, बसपासारखे पक्षांकडून मतदारांना वेगवेगळे आश्वासनं दिली जात आहेत. तर भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे दौरे करण्यास सुरुवात केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या जनतेला आज (29 ऑक्टोबर) संबोधित केले. या भाषणात शहा यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा बसवा, असे जनतेला आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य साधे सरळ आणि सोपे वाटत असले तरी त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी हेच नाव होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर मोदी यांच्या नावाला कोणी विरोधदेखील केला नाही. त्यांची लोप्रियता तसेच जनतेच्या मनात त्यांचे असलेले स्थान या गोष्टी यामागे असाव्यात. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावर आता चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये मोदी यांना पर्याय म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जात आहे. असे असतानादेखील शाह यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये 2024 ला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 ला योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवा असं विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील मोदीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील हे शाह यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय का असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्रात सत्ता स्थापन करायची असल्यास उत्तर प्रदेश हे राज्य ताब्यात असायला हवे असं राजकीय विश्लेषक सांगतात. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 16 टक्के जनता एकट्या उत्तर प्रदेशात राहत असल्यामुळे या राज्यातील जनतेचा कौल हा लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणारा असतो. तसेच या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल केंद्रातील सत्तेची दारं खोलतो असेदेखील म्हटले जाते. याच कारणामुळे उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. कदाचीत याच कारणामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी अमित शाहा यांना योगी आदित्यताथ यांना मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनवावं असं विधान केलं असावं.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार हे स्पष्ट झालेलं नसलं तरी ती 2022 मध्ये होईल. यापूर्वी 2017 साली येथे विधानसभा निवडणूक झाली होती. ही निवडणूक भाजपने जिंकली होती. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 14 मार्च 2022 ला संपणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी निवडणूक होणार असून बहुमतासाठी 202 हा अकडा गाठावा लागणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपला 312, काँग्रेसला 7 समाजवादी पार्टी म्हणजेच सपाला 47, तर बसपा म्हणजेच बहुजन समाज पार्टीला 19 जागांवर विजय मिळवता आला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.