ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांगांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या दिव्यांगांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली आहे.
लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांची गैरसोय होवू नये तसेच त्यांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. सध्या राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते थांबविले आहे. ज्याक्षणी या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास शासनाची मान्यता मिळेल त्यावेळी स्तनदा माता व दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे, असं शर्मा यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील स्तनदा माता आणि दिव्यांग बांधवांचे लसीकरण प्राधान्याने होणार आहे. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे पालिकेने केले आहे.
पालिकेच्या लसीकरण मोहिमेंतर्गत ऑनलाईन नोंदणीपासून वंचित असणाऱ्या तसेच लसीकरणासाठी शहरात ये-जा करणे सहज शक्य नसणाऱ्या आदिवासींचेही प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येऊर गाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शर्मा यांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या येऊर गाव, पाटीलवाडी महापालिका शाळेजवळील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक 4 जून 2021 पासून सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत तसेच ‘वॉक इन’ पद्धतीने नागरिकांना लस देण्यात येत आहे. परंतु, ऑनलाईन नोंदणीपासून आदिवासी पाड्यातील नागरिक वंचित राहिले असून लसीकरणासाठी त्यांना शहरात येणे सहज शक्य नाही. यासोबतच लसीकरणाबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज देखील आरोग्य विभागाच्यावतीने दूर करण्यात आला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.