राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासह मनसेचे काही नेतेही सोबत गेले आहेत.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
नागपूरच्या ऋषिकाची भरारी, चीनमधील स्पर्धेत करणार देशाचं प्रतिनिधित्व
प्रत्येक क्षेत्रात आता महिलांनी आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवलाय. क्रीडा क्षेत्रातही महिला देशाचं नावं मोठं करत आहेत. नागपूरची जलतरणपटू ऋषिका बडोलेची चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड झालीय. नुकत्याच बंगळुरूमध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी ट्रायल्समध्ये ऋषिकानं जोरदार कामगिरी केलीय. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय टीममध्ये निवड झालीय.चीनमधील चेंगडूमध्ये 28 जुलैपासून वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स सुरू आहेत. या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणारी ऋषिका ही नागपूरची दुसरी जलतरणपटू आहे. जैन युनिव्हर्सिटी, बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करणारी ऋषिका 50 आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
आमदार राजेंद्र शिंगणेंच्या निर्णयाने कार्यकर्ते संभ्रमात; प्रसेनजीत पाटील मात्र शरद पवारांसोबतच
आमदार राजेंद्र शिंगणेंच्या ‘यू टर्न’ मुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. दरम्यान घाटाखालील प्रमुख नेते प्रसेनजीत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.आमदार शिंगणे हे मुंबईस्थित ‘सिल्वर ओक’ व यशवंतराव चव्हाण केंद्रावर दिसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते निर्धास्त होते. जिल्ह्यात शिंगणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्थिती असल्याने ते एकदम स्वस्थ असल्याचे चित्र होते. मात्र आज त्यांनी अजितदादांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतल्याने हे चित्र बदलले. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी चव्हाण केंद्रावरील बैठकीला हजर होते. त्यांनी ‘आम्हीं शरद पवार साहेबांसोबत’ अशी ग्वाही दिली. मात्र आज शिंगणेंच्या निर्णयाने ते थक्क झाले! यामुळे कुणीही एकदी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी देखील स्पष्ट काही सांगायला तयार नाही.
ब्रिजभूषण सिंह हाजीर हो! लैंगिक छळवणूक आरोप प्रकरणी दिल्ली कोर्टाचं समन्स
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता त्यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे. महिला कुस्तीगीरांनी जे लैंगिक शोषण आरोप केले त्या प्रकरणात हे समन्स बजावलं गेलं आहे. सहा महिला कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता १८ जुलै रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे.राऊज एव्हेन्यू कोर्टाने WFI चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही समन्स जारी केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पोलिसांनी जी कलमं लावली आहेत ते सगळे गंभीर अपराध आहेत. या कलमांमध्ये कलम ३५४ ही आहे. ज्यामध्ये शिक्षेची तरतूद कमीत कमी पाच वर्षे आहे. तर एक कलम असं आहे ज्यामध्ये जामीन मिळत नाही. IPC च्या कलम ३५४ अ नुसार जास्तीत एक वर्ष शिक्षेची तरतूद आहे. तर ३५४ ड नुसार पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे
पंढरपूर : विठ्ठलाची प्रक्षाळपुजा संपन्न, नित्योपचार पूर्ववत
आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी गेली १७ दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यात आला. आषाढी यात्रे नंतर प्रक्षाळपूजा केली जाते. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले .दरम्यान,प्रक्षाळ पूजे निमित्त पुणे येथील भाविकाने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मंदिराच्या गर्भगृहास व मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठूराया अहोरात्र उभा होता.यात्रा सुरू झाल्यावर सलग १७ दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असल्याने विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी आज दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना भाविकांची आहे.
पीएसएल क्रिकेट संघाचे मालक आलमगीर खान यांची आत्महत्या
पाकिस्तान सुपर लीग (PSL) फ्रँचायझी मुल्तान सुलतान्सचे मालक आलमगीर तरीन यांनी लाहोरमधील गुलबर्ग भागातील त्यांच्या घरी आत्महत्या केली. प्रतिष्ठित येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आलमगीर यांनी वयाच्या ६३व्या वर्षी आपले जीवन संपवले. त्यांनी दक्षिण पंजाब, पाकिस्तानमध्ये एक अग्रगण्य व्यापारी म्हणून नाव कमावले आणि देशातील सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक चालवला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुल्तान सुल्तान्सचे सीईओ हैदर अझहर यांनी स्वत: आलमगीरच्या मृत्यूची पुष्टी केली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त केला.
राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यावर पुनर्विचार करणारी याचिका दाखल करत राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, ही याचिका आज ( ७ जुलै ) गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी भाजपा नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत येथील सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्वेश मोदी यांनी केला होता.
आशियाई खेळांबाबत BCCIचा मोठा निर्णय, आता आयपीएलच्या धर्तीवर ‘या’ स्पर्धेतही लागू होणार ‘हा’ नियम
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वोच्च परिषदेची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत बोर्डाने क्रिकेटशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या मालिकेत, बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघांच्या सहभागास मान्यता दिली आहे. बीसीसीआयने एका नोटमध्ये म्हटले आहे की, “व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाला क्षेत्ररक्षण करणे हे एक आव्हान असेल, परंतु देशासाठी खेळणे देखील महत्त्वाचे आहे आणि आव्हानांवर मात करून भारतीय संघ दोन्ही प्रकारांमध्ये खेळेल.”२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. आशियाई खेळांच्या तारखा एकदिवसीय विश्वचषकाच्या (ऑक्टोबर ५-नोव्हेंबर १९) तारखा एकत्र येत आहेत, ज्यामुळे पुरुषांच्या स्पर्धेत द्वितीय श्रेणीचा भारतीय संघ चीनला जाईल. तसेच, महिला गटात पूर्ण ताकदीचा संघ पाठवला जाईल. रिपोर्टनुसार, शिखर धवन आशियाई क्रीडा २०२२ मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व करू शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या स्पर्धा २८ सप्टेंबरपासून, तर महिलांच्या स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक; वडिलांनंतर 3 वर्षानी आईचंही निधन
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचं निधन झालं आहे. सांतिरानी असं त्यांच्या आईचं नाव होतं. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्यानं मिथुन चक्रवर्ती मातृशोकात आहेत. मिथून यांचा सर्वात छोटा मुलगा नमाशी याने आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनेत्याची भेट घेऊन त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचं म्हणजेच बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांआधीच निधन झालं होतं. वडिलांनंतर आता मिथुन चक्रवर्तींच्या डोक्यावरून आईच्या मायेचं छत्र देखील उडालं आहे.मिथुन चक्रवर्तीच्या आईच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलिवूड कलाकारांबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांची भेट घेत आईला श्रद्धांजली वाहली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्विट करत सांतिरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अभिनेते मिथुन चक्रवर्तीच्या आईचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मिथुन आणि त्यांच्या फॅमिलीला या दु:खातून बाहेर येण्याचं बळ मिळो”, असं त्यांनी म्हटलं आहे.
SD Social Media
9850 60 3590