राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं. यानंतर ठाकरे सरकारनं नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं. पण त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं होतं, अशा शब्दांत मुंबई सेशन्स कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे.
राणांविरुद्ध राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, पोलिसांच्या नोटिशीनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचं आंदोलन होतं, अटक होण्यापूर्वीच राणांनी आंदोलन मागे घेतलं. हिंसक मार्गाने सरकारचा पाडाव करण्याचा हेतू नव्हता
राणांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली, पण त्यासाठी 124 A अंतर्गत गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, अशा शब्दांत सेशन्स कोर्टानं सरकारला चपराक लगावली.
ब्रिटिशांच्या काळात लागू करण्यात आलेल्या राजद्रोहाच्या कलमात सुधारणा करण्याची गरज आता व्यक्त होतेय. तर दुसरीकडं सरकार आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा राजकीय वादावादी सुरू झालीय..
केवळ राणा दाम्पत्यच नाही, तर याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली म्हणून अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कंगना रनौत, नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या, गुणरत्न सदावर्ते, राज ठाकरे… अशी ही यादी हनुमानाच्या शेपटाप्रमाणं लांबतच चाललीय.