क्यू आर कोड वापरातून ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळणार

पर्यटन नगरी औरंगाबादमध्ये येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना अनेकदा येथील ठिकाणांचा इतिहास आणि माहिती जाणून घ्यायची असते. अशा ठिकाणांवर ती बोर्डावर लावलेलीही असते.

मात्र अनेकदा हे बोर्ड खराब अवस्थेत असतात. त्यावरील माहिती वाचता येत नाही. त्यामुळे माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो. औरंगाबादेतदेखील बहुतांश ठिकाणी लावलेले बोर्ड खराब झाले आहेत. पुरातत्त्व विभागाने पुस्तिका, लिफलेट अशा माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिली होती. मात्र आता पेपरलेस कामकाजाचा पुरस्कार करताना ही सर्व साधने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती देण्यासाठी क्यू आर कोडचा वापर केला जाणार आहे.

विशेष म्हणजे पुरातत्व विभागाच्या या अभिनव उपक्रमात पर्यटकांना मातृभाषेत माहिती उपलब्ध होऊ शकेल. पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळ-पांडव लेणी येथे पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी क्यू आर कोड लावण्यात आले आहेत.

वास्तूंमध्ये विविध ठिकाणी हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांची माहिती उपलब्ध होण्याचे प्रमाण शंभर टक्के नसले तरी 85 ते 90 टक्के होऊ शकते, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच पर्यटन स्थळांची अचूक माहिती पोहोचवण्याकरिता ही उत्तम योजना ठरू शकते, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुरातत्व विभागाच्या या उपक्रमाचे औपचारिक उद्धाटन एएसआय कार्यालयात औपचारिक पद्धतीने करण्यात आले. शहरालगतच्या वास्तूंमध्ये क्यू आर स्कॅनची सोय असल्याने कुणालाही सहजपणे माहिती मिळू शकते. पर्यटकांना डिजिटल माहिती उपलब्ध करून दिल्याने फसवणुकीचा धोकाही टाळला जाऊ शकतो. तसेच आपल्या मातृभाषेत पर्यटनस्थळांची माहिती वाचण्याचा आनंदही पर्यटकांना मिळेल, असा विश्वास विभागाने वर्तवला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.