ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रिकी पाँटिंग यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यावेळी रिकी पाँटिंग कमेंट्री करत होते. मात्र अचानक छातीत दुखायला लागल्यानतंर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाँटिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
रिकी पाँटिंग चॅनेल ७ साठी कमेंट्री करतात. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही ते कमेंट्री पॅनेलमध्ये होते. जेव्हा सामन्याचा लंच ब्रेक झाला तेव्हाच पाँटिंग यांनी कमेंट्री रूम सोडली. थोड्या वेळाने त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या दरम्यान पाँटिंग यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांनी आपल्यासोबत काम करत असलेल्या लोकांना सांगितलं की, त्यांना बरं वाटत नाहीय. तसंच रुग्णालयात जायचं आहे. त्यांनी असं सांगताच वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रिकी पाँटिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. चॅनेल ७ च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, रिकी पाँटिंग यांना अस्वस्थ वाटत आहे. आजच्या उर्वरित कव्हरेजसाठी ते कमेंट्री करू शकणार नाहीत.