सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सामान्य लोकांना खेळण्याची संधी मिळते, तसेच अनेक सेलिब्रिटी देखील येथे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत हा बुद्धीचा खेळताना दिसतात. पण, या शुक्रवारचा म्हणजेच 3 डिसेंबरचा एपिसोड सर्वांसाठीच खूप खास ठरला आहे. या शुक्रवारी केबीसीने एक मोठे यश संपादन केले आहे. या लोकप्रिय शोने 1000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी आणि खेळ खेळण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय शोमध्ये पोहोचले होते.
केबीसीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली सहभागी झाल्या होत्या. याशिवाय जया बच्चनही या शोमध्ये ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
सोनी टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘केबीसी’ने एक हजार भाग पूर्ण केल्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांचे कुटुंब या गेममध्ये सामील झाले होते. या एपिसोडदरम्यान जया बच्चन यांनी अनेकवेळा बिग बींची बोलतीच बंद केली आणि अनेक वेळा त्यांना घरी केलेल्या निष्काळजीपणाची आठवणही करून दिली. शोमध्ये उपस्थित नव्या आणि श्वेता देखील जया बच्चन यांना पूर्ण पाठिंबा देत होत्या. या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले जेव्हा अमिताभ स्वतःच्या शोमध्ये कमी बोलताना आणि जास्त ऐकताना दिसले.
अमिताभ बच्चन यांची नात नव्याने त्यांच्या या 21वर्षांच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखवला. त्या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचा केबीसीसोबतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला होता. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या या शोने यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. हा व्हिडीओ संपल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले.
अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सुरु असताना जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही लोक हा शो कधीच थांबवू नका. भले कमीप्रमाणात करा पण सतत करा. हा शो बंद करण्याचा निर्णय झाल्यावर कितीतरी लोकांची निराशा झाली होती. यातून कितीतरी लोकांना खूप महत्त्वाची माहिती मिळते..’ यानंतर बिग बींच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते स्वतःला रडण्यापासून रोखू शकले नाहीत.