मुंबईच्या समुद्रात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाचा समावेश

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे. यामध्ये एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता याप्रकरणात काय समोर येते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. शनिवारी ही बोट गोव्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी ही बोट पुन्हा मुंबईत परतणार होती. या क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार अंमली नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच क्रुझवर प्रवेश मिळवला होता. क्रुझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला.

या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी संबंधित काहीजण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

गोव्याला जाणाऱ्या या क्रुझवर दिल्लीतील एका कंपनीच्या माध्यमातून पार्टी आयोजित करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुकिंग करुन क्रुझमध्ये प्रवेश मिळवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रुझवर दाखल झाले होते.

क्रुझवर पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रुझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रुझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्याठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेव्ह पार्टीत बॉलीवूडमधील सुपरस्टारचा मुलगा
या रेव्ह पार्टीत बॉलीवूडमधील सुपरस्टारचा मुलगाही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, ही माहिती खरी असल्यास मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची रात्रभर कसून चौकशी केली आहे. रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज कसे आणि कुठून आणले, याविषयी संबंधितांना विचारणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.