वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज पार पडलं. पण या सूर्य ग्रहणापूर्वी अवकाशात एक गूढ प्रकाश चमकला. पंजाबसह उत्तर भारतातील अनेक राज्यात काळ्या कभिन्न ढगात उजेडाची एक रेषा चमकून गेली. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या गूढ प्रकाशावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुणाला हा गूढ प्रकाश म्हणजे एलियन्सची तर इतर काहींना ही UFOची दस्तक असल्याचं वाटलं. तर काहींना एल मस्कची एलन मस्कची स्टारलिंक सॅटेलाईट असल्याचं वाटलं.
मीडिया रिपोर्टनुसार पंजाबच्या पठानकोटमध्ये शुक्रवारी अवकाशात गूढ प्रकाश दिसला. अचानक प्रकाशाची माळ अवकाशात दिसल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले. संध्याकाळी 6.50 वाजता हा गूढ प्रकाश दिसला. तब्बल पाच मिनिटे हा गूढ प्रकाश अवकाशात दिसला. त्यामुळे नेमकं काय घडतंय हेच लोकांना कळेना. आधीच कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यात हा अजीब प्रकाश पाहायला मिळाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झालं. नवं संकट तर पृथ्वीवर येत नाही ना? अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली.
सोशल मीडियावर अफवांचे बाजार गरम
आकाशात गूढ प्रकाश दिसल्यानंतर अनेकांनी अकाशातील हा नजारा मोबाईलमध्ये कैद केला. काहींना फोटो काढले तर काहींनी व्हिडीओ शूटिंग केली. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर अफवांचं पीकही आलं. काहींना एलिएन्स तर काहींनी UFO पृथ्वीवर येत असल्याचं म्हटलं. तर काहींना काही तरी अघटीत घडणार असल्याचा साक्षात्कार झाला.
हा गूढ प्रकाश नागरिकांना पाच मिनिटं अनुभवता आला. जणू काही एखादी सुपरफास्ट लोकल पळावी तशा वेगाने हा प्रकाश पळताना दिसत होता. काहींना तर हे रॉकेटल असल्याचंही वाटलं.
केवळ पंजाब आणि उत्तर भारतातच नाही तर गुजरात आणि काश्मीरमध्येही हा प्रकाशाची रेघ पाहायला मिळाली. जम्मू-काश्मीरच्या जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर, राजौरी आणि पुंछमध्ये हा नजारा पाहायला मिळाला. तर गुजरातच्या जूनागड, उपलेटा आणि सौराष्ट्रातील काही भागात हा रहस्यमयी प्रकाश पाहायला मिळाला. दरम्यान, गुजरात कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सल्लागार नरोत्तम साहू यांनी हे यूएफओ नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एखादा उपग्रह लो अर्थ ऑर्बिटपासून जात असल्यामुळे हा प्रकाश दिसत असावा, असं साहू यांनी स्पष्ट केलं. संरक्षण विभागाच्या सूत्रांनीही हा एखाद्या उपग्रहाचा प्रकाश असल्याचं स्पष्ट केलं.