युपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. जीवापाड मेहनत करुन यामध्ये मोजकेच उमेदवार पास होतात. यातच एक महत्त्वाचं नाव म्हणजे आयएएस अधिकारी कनिका राठी.
हरियाणाच्या बहादूरगड येथील रहिवासी असलेल्या कनिका राठी यांनी यूपीएससी परीक्षेत 64 वा क्रमांक पटकावला होता. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी सरकारी नोकरीही सोडली होती. कनिका राठी यांनी आयएएस होण्यासाठी तब्बल 6 वर्षे मेहनत केली. यानंतर मे 2022 मध्ये अंतिम निकाल लागल्यानंतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज IAS कनिका राठी यांचा यशस्वी प्रवास जाणून घेऊयात.
हरियाणाच्या बहादूरगढ येथील रहिवासी असलेल्या कनिका राठी यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून संपूर्ण गावाची प्रतिष्ठा वाढवली आहे. नागरी सेवा परीक्षेत 64 वा क्रमांक मिळवून कनिका यांनी त्यांचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कनिका यांनी सरकारी नोकरीही सोडली होती. त्यांच्या यशाचे पूर्ण श्रेय त्या त्यांच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला देतात.
आयएएस कनिका राठी यांचे वडील नरेश राठी हे इंजिनिअर आहेत. त्यांचे काका डॉ. अनिल राठी हे झज्जरच्या वैद्यकीय विभागात वरिष्ठ डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्यांची आई नीलम त्रिपाठी या शिक्षिका आहेत. कनिका राठी शालेय जीवनापासून खूप तेजस्वी आहेत. बाल भारती स्कूल, बहादूरगढ येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल महाविद्यालयातून गणितासह बीएस्सीची पदवी प्राप्त केली. त्यांनी अशोका विद्यापीठातून लिबरल स्टडीजमध्ये पीजीही केले आहे.
IAS कनिका राठी यांनी 2015 मध्ये UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यांनी दिल्लीतील करोलबाग येथील कोचिंग सेंटरमधून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. 2016 आणि 2017 मध्ये त्यांना यूपीएससीमध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली.
यानंतर 2019 मध्ये कनिका राठी यांना गृह मंत्रालयात नोकरी मिळाली. पाटण्याच्या आयबी विभागात काही काळ सरकारी नोकरी केल्यानंतर त्यांनी
आई-वडिलांच्या संमतीने त्यांनी राजीनामा दिला आणि यूपीएससी परिक्षेची तयारी केली. 30 एप्रिल 2022 रोजी UPSC मुलाखत दिल्यानंतर त्यांचा निकाल 30 मे 2022 रोजी आला आणि यूपीएससी परीक्षेत 64 व्या क्रमांकांने उत्तीर्ण होत त्यांनी आभाळाला गवसणी घातली. अखेर चौथ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयएएस झाल्या.
आयएएस कनिका राठी यांना बागकाम आणि पेंटिंगचीही खूप आवड आहे. त्या रोज 5-6 तास अभ्यास करायच्या. त्या उजळणीला यशाची गुरुकिल्ली मानतात. त्यांनी एक वर्ष कोचिंगची मदत घेतली, पण त्यानंतर त्यांनी स्व-अभ्यासाला प्राधान्य दिले, त्यासाठी त्यांनी यूट्यूबवर उपलब्ध ट्युटोरियल्सचीही मदत घेतली. त्यांचा हा प्रवास स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.