कोण काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक बातमी कतारमधून समोर आली आहे. मिरजेतील खराब रस्त्याचा मुद्दा एका तरुणाने चक्क कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप मॅचदरम्यान उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इम्तियाज पैलवान असं या तरुणाचं नाव आहे. सध्या कतारमध्ये फुटबॉलचा विश्चचषक सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क सामना पहाण्यासाठी आलेल्या इम्तियाज पैलवान याने प्रेक्षक गॅलरीतून मिरजेतील रस्त्यांची स्थिती मांडली आहे. त्याने मिरजेतील खराब रस्त्यांचे पोस्टर झळकवत या प्रश्नाला वाचा फोडली.
रस्ते कधी होणार?
इम्तियाज पैलवान हा मिरजमधील अमननगर येथील रहिवासी आहे. तो नोकरीनिमित्त कतारला राहातो. सध्या कतारमध्ये फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क यांच्यातील फुटबॉल सामना पाहाण्यासाठी गेला होता. मॅच सुरू असताना त्याने मिरजेतील खराब रस्त्याचा मुद्दा प्रेक्षक गॅलरीत बसून उपस्थित केला. ‘ I LOVE MIRAJ मला अभिमान आहे मिरज शहराचा. काही राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिरजेतील रस्ते होत नाही . मिरजेतील रस्ते कधी होणार ?’ असा मजकूर असलेलं पोस्टर झळकवत त्याने मिरजमधील रस्त्यांची अवस्था मांडली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचांड व्हायरल होत आहे. मिरजेतील रस्त्याचा प्रश्न या व्हिडीओमुळे थेट आंतराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तरी इथले रस्ते चांगले होणार का? असा प्रश्न मिरजकर विचारत आहेत. तसेच रस्त्याचा प्रश्न हटके पद्धतीने मांडल्याने अनेकांकडून या तरुणाचं कौतुक देखील केलं जात आहे.